शनिवारी रात्री पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली. मात्र, यानंतर नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र आहे. नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्री पदावरुन वाद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला आता राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळाले होते, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली होती. मात्र, दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांना डावलल्याची चर्चा असून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध आणि निदर्शने झाली होती. यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
रायगडमधून भरत गोगावले यांच्याऐवजी अदिती तटकरे यांची निवड झाल्याने शिवसेनेकडून विरोध झाला. महाड विधानसभा संघातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले. तसेच मुंबई- गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शने केली. तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलून गिरीश महाजन यांची वर्णी लागल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. अखेर १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आला.
भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळालं नाही तरी तो डगमगणार नाही. भरतशेठला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, ईश्वर के घर देर हे अंधेर नहीं असे भरत गोगावले यांनी म्हटले होते. हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रियाही गोगावले यांनी दिली होती.
हे ही वाचा:
शेखर यादव यांच्या समान नागरी कायद्याबाबतच्या वक्तव्याविरोधात डावे एकवटले!
भारत ठरला पहिल्या खोखो विश्वचषकाचा विजेता; पुरुष-महिला संघांनी जिंकली फायनल
दिल्ली निवडणुकीनंतरच भाजपला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष!
सैफ अली खान वर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, ठाण्यातून अटक
पालकमंत्री पद गिरीश महाजन यांना मिळाल्यानंतर दादा भुसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, पालकमंत्रिपदी डावलणे अशातला काही भाग नाही. जी जबाबदारी दिली ती पुढे नेणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम असते. मला जी काही जबाबदारी दिली ती पुढे नेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संवाद साधून निर्णय घेतले आहेत. ते निर्णय पुढे नेणे आमची जबाबदारी आहे.