24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारण...आणि आदित्य ठाकरेंना वरळीकरांची आठवण आली!

…आणि आदित्य ठाकरेंना वरळीकरांची आठवण आली!

तीन वर्षांनंतर आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघाची आठवण झाली.

Google News Follow

Related

वरळीत आपण केलेल्या कामामुळे सर्वच राजकीय पक्षांचं इथं लक्ष आहे. त्यांना इथे वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. त्यांनी इथे बेकायदेशीररित्या लावलेले बॅनर्स हेच दाखवतात की, आपण इथे केलेली कामगिरी हेवा वाटण्यासारखी आहे. अशा आशयाचं पत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांना लिहत त्यांना भावनिक साद घातली आहे. आमचं सरकार पडलं असलं तरी आम्ही यापुढेही निःस्वार्थीपणे काम करतच राहू, असं आश्वासनसुद्धा आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातील नागरिकांना दिलं आहे.

मागे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली तेव्हापासून आता महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रथमच अशी पत्राच्या स्वरूपात वरळीतील नागरिकांना साद घातली. सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षे हे सरकार कारभार करत होते, त्या काळात आदित्य ठाकरेंनी एकदाही नागरिकांना एखाद पत्र लिहिलं नाही. आता अचानक आदित्य ठाकरेंना वरळी मतदार संघाची आठवण कशी काय आली, असा प्रश्न त्यामुळे विचारला जाऊ लागला आहे? वरळीचा हा मतदारसंघ म्हणजे पूर्वीपासूनचं शिवसेनेचा बलाढ्य किल्लाच आहे. शिवाय, आता आदित्य ठाकरे हे तिथले आमदार असले तरी त्यांच्याव्यतिरिक्त सुनील शिंदे आणि सचिन अहीर हे विधानपरिषदेतील आमदारही याच विभागातील. माजी महापौर किशोरी पेडणेकर यादेखील वरळीच्याच. वरळी कोळीवाड्यातही शिवसेनेच्याच नगरसेविका आहेत. गेली दोन टर्म शिवसेनेचा तो गड आहे. पहिल्यापासून वरळी मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने आदित्य ठाकरेंना तेथून निवडणूक लढवणं सोपं होत. त्यांनी निवडणूकही शिवसेना भाजपा युती असताना लढवली होती. त्यामुळे त्यांना जास्त काही मेहनत न करता वरळीतील जागा जिंकता आली होती.

निवडणूक पार पडली आणि शिवसेना भाजपा युती तुटली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. निवडणूक झाल्यानंतर आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघात फारसे फिरकलेले नाहीत. त्यांचा बहुतेक असा समज झाला असण्याची शक्यता आहे की, वरळी शिवसेनेचा बाल्लेकिल्ला आहे त्यामुळे पुढेही आपण येथून निवडून येऊ. मात्र, मागच्या तीन ते चार महिन्यांत अचानक चित्र बदलू लागलं आणि पुढे काय होणार याचा अंदाज आदित्य ठाकरे यांना येऊ लागला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाला रोज कोणत्या ना कोणत्या मतदारसंघातून खिंडार पडतचं आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यामधून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. पुण्यात युवती सेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह ३६ युवती पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत राजकारणामुळे राजीनामे दिले आहेत. राजीनामे जरी दिले असले तरी आम्ही कार्यकर्ती म्हणून काम करत राहणार असं या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र, काम जरी करत असल्या तरी त्यांनी अंतर्गत वादामुळे राजीनामे दिलेत हे स्पष्ट आहे. ही झाली एक घटना अशा नियमित ठाकरे गटाला खिंडार पडण्याच्या बातम्या येतंच असतात.

यावर्षी भाजपाचेही वरळी मतदारसंघात अनेक कार्यक्रम झाले ज्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दहीहंडीचे आयोजन प्रथमच सचिन अहीर यांच्या मतदार संघात भाजपाने करून दाखविले आणि त्याला भरघोस प्रसिद्धीही मिळाली. यामुळे आदित्य ठाकरे यांना पुढचं चित्र स्पष्ट दिसू लागलं असावं. मागेच जवळपास ५०० ते ६०० कोळी बांधवांनी एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शवला होता. कोळी बांधवानी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचे कारण होत ते म्हणजे वरळी येथे होत असलेल्या कोस्टल रोडबाबत त्यांनी आदित्य ठाकरेंकडे सातत्याने विविध मागण्या केल्या होत्या. मात्र, वेळोवेळी फक्त मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले बाकी हाती काही लागले नाही, त्यामुळे अखेर नाराज होऊन हे कोळी बांधव मुख्यमंत्र्यांकडे गेले, असे म्हटले गेले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. वरळीला सुद्धा ते अनेकदा जाऊन आले होते. संघटनेला बळकटी आणण्यासाठीच एकनाथ शिंदे तिथे गेले. त्याचा परिणाम म्हणजे या कोळी बांधवांनी आणि तेथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला. शिंदे यांना वरळीतून पाठिंबा मिळणं हे आगामी निवडणुकांसाठी वेगळे संकेत देणारे आहे. सध्या आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन प्रचार करत आहेत. त्यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. या सगळ्या प्रचारात त्यांचा रोख हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर आहे. खोके, गद्दार या शब्दांचा वापर करत त्यांची वारंवार तीच टीका सुरू असते. पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काळात जाहीर होऊ शकतील. अशावेळी मुंबई हातून जाऊ नये यासाठी मोर्चेबांधणी ही जास्त महत्त्वाची आहे. शिवाय, आता ठाकरे कुटुंबाकडे हे आव्हान पेलण्यासाठी फारशी अनुभवी माणसेही नाहीत. अशावेळी वरळीतून आपल्या मोहिमेला सुरुवात करण्याचा आदित्य ठाकरे यांचा मानस असावा. दादर, माहीम या मतदारसंघातील आमदार हे एकनाथ शिंदे गटात आहेत. त्यामुळे वरळीसारखा गड आपल्याकडे राहावा यासाठी आदित्य ठाकरे यांनी तयारी सुरू केली असावी. त्यामुळे उद्धव ठाकरे जसे कार्यकर्त्यांना भावनिक साद घालतात तशीच आदित्य ठाकरेंनी वरळी नागरिकांना भावनिक साद घातली असावी. आता या हाकेला वरळीचा मतदार कसा ‘ओ’ देतो ते येत्या निवडणुकांत पाहायला मिळेल. आमदारकीची निवडणूक लढवताना त्यांनी मतदारांना आपल्या बॅनर्सच्या माध्यमातून ‘कसं काय वरळी’ अशी विचारणा केली होती, पण अशी विचारणा वारंवार करावी लागते. त्याकडे पाठ दाखविली की, लोकही मग आपल्या लोकप्रतिनिधीला विसरतात. आदित्य ठाकरे यासाठी नेमके काय करणार हे येत्या काळात समजेलच.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा