अदानींना १०८० एकर जागा दिल्याचा कॅबिनेट निर्णय आदित्य ठाकरेंनी दाखवावा

आमदार आशिष शेलार यांचे आव्हान

अदानींना १०८० एकर जागा दिल्याचा कॅबिनेट निर्णय आदित्य ठाकरेंनी दाखवावा

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे सत्ताधारी पक्षांवर टीका करत आहेत. विशेषतः ते भाजपाला लक्ष्य करत असून धारावी पुनर्विकासाच टेंडर अदानीला दिलं असून मुंबईतील तुमची आमची जमीन अदानी यांना फुकटात दिल्याचा आरोप ते करत आहेत. यावरून आता भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत या मुद्द्यावरून खुल्या चर्चेला येण्याचे आव्हान दिले आहे.

आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्या ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांबद्दल काही प्रश्न उपस्थित करत त्यांच्याकडे उत्तरे मागितली आहेत. तसेच आपण आदित्य ठाकरे यांच्यासोबत खुल्या चर्चेला तयार आहोत, असे थेट आव्हान दिले आहे.

आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. खोटं बोलून पळ काढू नका. १०८० एकर आकडा आला कुठून? अदानींच्या नावावर १०८० एकर जागा चढली, सरकारने दिली याबाबत शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवा. उलट धारावीतील नेचर पार्क ३७ एकरचा भूखंड हडप करण्याचा डाव आहे की नाही? तुम्ही उत्तर द्या. आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत, तुम्ही या. नाहीतर पेंग्विनची काळजी करत राणीच्या बागेत बसा, असा खोचक सल्ला देत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले आहे.

हे ही वाचा:

बहराइच घटनेवर तोंड बंद; अखिलेश यांचा हिंदूविरोधी डीएनए दिसतो!

५ कोटी न दिल्यास सलमानची अवस्था बाबा सिद्दींकीपेक्षा वाईट करण्याची धमकी

राजकोट पुतळा प्रकरण: पुतळ्याचे वेल्डिंग करणाऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक

हमासचा म्होरक्या सिनवरच्या खोपडीचा इस्रायलने घेतला वेध

आदित्य ठाकरेंनी धारावी पुनर्विकास योजनेवरुन भाजपावर टीका केली आहे. धारावीत पुनर्विकासाचे कंत्राट अदानींना दिलंय. मुंबईतील तुमची आमची जमीन अदानींना फुकटात दिली आहे. कुर्ला, मढ, देवनार येथील जमीनही देऊ केलीये. मुंबईतील एकूण १०८० एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात घातली आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. याला आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Exit mobile version