एकीकडे देशभरात विविध ठिकाणी हिजाबच्या मुद्द्यावरून राजकारण केले जात असताना शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र शाळा कॉलेजात गणवेशालाच महत्त्व द्यायला हवे, असे म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिथे शाळा कॉलेजच्या नियमांनुसार गणवेश घालणे बंधनकारक आहे, तिथे त्याचे पालन केले गेले पाहिजे. तिथे केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे. धार्मिक किंवा राजकीय मुद्दे त्याठिकाणी चर्चिले जाणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.
कर्नाटकात सध्या हिजाबच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. उडुपी येथील एका कॉलेजच्या मुलींनी आम्ही हिजाब घालून कॉलेजला येणार असा हट्ट धरला होता. पण कॉलेज व्यवस्थापनाने त्यांना तशी परवानगी दिली नाही. मात्र त्या मुलींनी आंदोलनाचे हत्यार उपसले आणि न्यायालयातही धाव घेतली. त्यामुळे तिथे शिकत असलेल्या हिंदू मुलामुलींनीही मग भगव्या ओढण्या आणि उपरणी घालून कॉलेजात प्रवेश केला. त्यावरून हा वाद पेटला. देशातील इतर राज्यांतही या विषयावर आंदोलने झाली. हिजाब घालण्यास संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे, अशा घोषणा करण्यात आल्या.
हे ही वाचा:
विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगींनी केला खास फोटो शेअर
यूपी निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का…
काय आहेत ‘हिजाब’बाबत घटनात्मक तरतुदी आणि इतर देशांतील स्थिती?
सचिन वाझे म्हणतो, मला अनिल देशमुखांनीच वसुलीचे आदेश दिले!
आता यात विविध राजकीय नेत्यांनी उडी घेत हे प्रकरण कसे पेटेल याची काळजी घेतली आहे. कुणी कोणते कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हिजाबच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. पण शिवसेनेने कॉलेज शाळांतील नियमांनुसारच गणवेश घातले गेले पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे.