शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आमचेच असताना आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. अजित पवारांनी अडीच वर्षात सेनेची वाट लावली, असा आरोपही त्यांनी यावेळी अजित पवारांवर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना आढळराव पाटील म्हणाले, आम्हाला फक्त एकनाथ शिंदे मदत करायचे. जो काही निधी हवा होता तो त्यांनीच मिळवून दिला आहे. त्यांना आमच्या व्यथा माहिती असायच्या.
पुढे ते म्हणाले, जेव्हा पक्षातील ४० आमदार बंड करतात तेव्हा चूक समजली पाहिजे. पण असे झाले नाही. यादरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. माझं कर्तव्य म्हणून, मी त्यांचं अभिनंदन केले आणि पक्षाला हे आवडलं नाही. माझं उद्धव ठाकरे यांच्याशी फोन वर बोलणं झालं त्यांनी सांगितलं पोस्ट आवडली नाही. दुसऱ्याच दिवशी सामनात माझ्या हकालपट्टीची बातमी छापून आली. जेव्हा मी विचारणा केली तेव्हा चुकून झालं असं मला उत्तर मिळालं. उद्धव ठाकरे, विनायक राऊत यांनी हे चुकून झाल्याचं सांगितलं. तेही मी विसरलो आणि उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो. उद्धव ठाकरे यांना पुढची योजना सांगितली. त्यांना राष्ट्रवादीची साथ सोडण्याचं आवाहन केलं. पण ते म्हणाले, ते शक्य नाही, अशी व्यथा आढळराव पाटील यांनी मांडली आहे.
हे ही वाचा:
“शरद पवारांनी वेळ साधून शिवसेना फोडली”
एकनाथ शिंदेंकडून शिवसेना भवनावर दावा?
मुंबईच्या माजी आयुक्तांची सीबीआयकडून चौकशी
गायक, गझलकार भूपिंदर सिंह यांचे निधन
शरद पवार यांनी ज्यांच्याशी युती केली ते पक्ष संपले, असा आरोप आढळराव पाटील यांनी केला आहे. आम्ही कधीही हिंदुत्वाचा विचार सोडलेला नाही. बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, असंही यावेळी आढळराव पाटील म्हणाले आहेत.