‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत प्रभू श्रीरामचंद्रांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अरुण गोवील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार अरुण सिंह यांच्या उपस्थितीत गोवील यांनी भाजपाचे सदस्यत्व घेतले आहे. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या तोंडावर गोवील यांचा भाजपा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.
देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्व पक्ष कंबर कसून प्रचारात व्यग्र झालेले दिसत आहेत. भारतीय जनता पार्टीने ‘मिशन बंगाल’ वर विशेष लक्ष केंद्रीत केले असून बंगाल मध्ये सत्ता स्थापन करायचा चंग बांधला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गज प्रवेश करत आहेत. गुरुवारी अभिनेते अरुण गोवील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गोवील हे पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा प्रचार करणार असल्याचे सांगितले जात आहे. बंगालमध्ये गोवील हे शंभरपेक्षा जास्त सभा घेणार असल्याचे समजत आहे.
हे ही वाचा:
वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी, मित्रपक्ष झाले आक्रमक
सचिन वाझेला मुंबई पोलिसांपासून वाचवा, अन्यथा त्यांचा मनसुख हिरेन होईल
ममतांच्या ‘खेला होबे’ला मोदींच्या ‘विकास होबे’ने उत्तर
राजकीय भूकंपाची शक्यता, दोन मंत्र्यांची होणार एनआयएकडून चौकशी?
कोण आहेत अरुण गोवील?
अरुण गोवील हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून त्यांचा जन्म मेरठमध्ये झाला आहे. नव्वदच्या दशकात रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत अरुण गोवील यांनी प्रभू श्रीरामांची मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली. गोवील यांच्या प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. टीव्हीवर ही मालिका सुरु झाल्यावर रस्त्यावर शुकशुकाट असायचा कारण देशभरातून लोक ही मालिका बघण्यात मंत्रमुग्ध झालेले असायचे. गेल्या वर्षी जेव्हा भारतात लोकडाऊन जाहीर केल्यानंतर ‘रामायण’ मालिकेचे पुन्हा एकदा प्रक्षेपण करण्याचा निर्णय भारत सरकारतर्फे घेण्यात आला. यावेळीही लोकांनी या मालिकेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.