पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध आपण गुन्हा दाखल करू शकतो, जर त्यांनी आपण पाठवलेल्या पत्रांना उत्तरे दिली नाहीत तर, असा इशाराच देण्यात आला आहे. सध्या पंजाबचे राज्यपाल विरुद्ध आम आदमी पक्षामध्ये लढाई सुरू आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना अखेरचा इशारा दिला आहे. ‘मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना पाठवलेल्या पत्रांना उत्तरे न दिल्यास मी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतो आणि त्यांच्याविरोधात गुन्हेगारी कारवाईही करू शकतो. हा सरकारला अंतिम इशारा आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील,’ असा इशारा पुरोहित यांनी दिला आहे.
एका वृत्तपत्राला राज्यपाल पुरोहित यांनी मुलाखत दिली. ‘ मी त्यांना एक महिन्याची किंवा त्याहून कमी मुदत देईन. माझ्यासमोर सारे पर्याय खुले आहेत. मी त्यांच्यावर कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करू शकतो. या अंतर्गत राज्यपालांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुख्यमंत्री किंवा अन्य कोणावरही गुन्हा दाखल करता येऊ शकतो. मी राष्ट्रपतींनाही पत्र लिहू शकतो. राज्यामधील लोकशाहीचे तंत्र पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली आहे. माझ्याकडे दररोज अगणित तक्रारी येत आहेत. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. पंजाबमधील पाचपैकी एक व्यक्ती नशेच्या आहारी गेला आहे,’ असे पुरोहित यांनी सांगितले.
हे ही वाचा:
एकट्या पोलिसाने कोयता घेऊन हप्ते वसुली करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
काळू- बाळूंची कन्स्पिरसी थिअरी
अमेरिकेत फुटबॉल सामन्यादरम्यान गोळीबार
पंजाबची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. विद्यापीठाच्या शिक्षकांना अनेक महिने पगार मिळालेला नाही. सरकारवरील कर्जाचा बोझाही वाढत आहे, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले. ‘भगवंत मान म्हणतात की, ज्या साडेतीन कोटी लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. मात्र राज्यघटनेनुसार, ते याबाबत काय करत आहेत, हे सांगणे त्यांचे कर्तव्य आहे,’ असेही पुरोहित यांनी नमूद केले.
‘राज्यपालांच्या धमक्यांना जुमानत नाही’
राज्यपाल पुरोहित यांनी राष्ट्रपती राजवटीचा इशारा दिल्यानंतरही भगवंत मान यांनी ‘निवड करण्यात आलेल्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीला धमकावण्याचा कोणताही अधिकार नाही. मी त्यांच्या धमक्यांना जुमानत नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडू यांसारख्या बिगर-भाजप राज्यांच्या सरकारच्या कामात अडथळा आणण्यासाठी हे राज्यपाल केंद्र सरकारच्या बाहुल्या म्हणून काम करत आहेत,’ असा आरोपही मान यांनी केला.