नवनीत राणांना ॲसिड हल्ल्याची धमकी, संजय राऊतांवर संशय

नवनीत राणांना ॲसिड हल्ल्याची धमकी, संजय राऊतांवर संशय

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना ॲसिड हल्ल्याची धमकी आलेली आहे. “ज्या चेहऱ्यावर तू एवढा घमंड करतेस तो चेहरा आम्ही विद्रुप करु” असे या धमकीच्या पत्रात म्हटले आहे. राणा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पाठवण्यात आलेले हे धमकीचे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवरून पाठवण्यात आल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. यासंबंधी खासदार नवनीत राणा यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली असून राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.

दिल्ली येथील नॉर्थ एव्हेन्यू पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या सरकारी निवासस्थानी मंगळवारी एक निनावी धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात राणा यांच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पात्रात नवनीत राणा यांचे पती आणि महाराष्ट्र विधानसभेचे आमदार रवी राणा यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अपशब्द आणि शिव्यांनी भरलेल्या या पत्रात नवनीत राणा यांच्या संसदेतील भाषणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रावर कोणाचेही नाव किंवा पत्ता नसला तरीही शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे. राणा यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर आणि सत्ताधारी शिवसेना पक्षावर सडकून टीका केली होती. त्या भाषणामुळेच त्यांना हे धमकीचे पत्र आलेले आहे

हे ही वाचा:

बंगाल निवडणुकीच्या तोंडावर सरसंघचालक मोहन भागवत मिथुनच्या भेटीला

खासदार राणा यांनी दिल्ली पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी हे धमकीचे पत्र पाठवल्याचा संशय असल्याचे या एफआयआर मध्ये नमूद करण्यात आले आहे. या पत्रासोबतच फोन करूनही अश्लील भाषेत धमकावले जात असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.

Exit mobile version