काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले प्रमोद कृष्णम म्हणाले, राम आणि राष्ट्र याबाबत तडजोड नाही!

पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर कृष्णम यांच्यावर झाली कारवाई

काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले प्रमोद कृष्णम म्हणाले, राम आणि राष्ट्र याबाबत तडजोड नाही!

काँग्रेसचे नेते आणि सातत्याने काँग्रेसच्या भूमिकांवर सडकून टीका करणारे प्रमोद कृष्णम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

कृष्णम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याआधी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याविषयी त्यानी प्रतिक्रिया दिली की, राम आणि राष्ट्र याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

उत्तर प्रदेश काँग्रेस समितीने प्रमोद कृष्णम यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. कृष्णम यांच्याविरोधात शिस्तभंग आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात सातत्याने विधाने केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे उत्तर प्रदेश काँग्रेसने म्हटले होते.

हे ही वाचा:

शेतकऱ्यांचे दिल्लीला प्रयाण; हरियाणातून पंजाबला जाणारे रस्ते बंद!

पाच वर्षांत देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म!

खलिस्तानी दहशतवाद्याच्या सहकाऱ्याच्या घरावर गोळीबार

भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूंबाबत अमेरिकी राजदूतांकडून शोक

 

या महिन्याच्या प्रारंभी कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. १९ फेब्रुवारीला होत असलेल्या काल्की धाम मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यासाठी पंतप्रधानांना आमंत्रित केले होते. त्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी होती.

त्या भेटीनंतर कृष्णम यांनी पोस्ट टाकली होती की, माननीय पंतप्रधानांनी माझ्याकडून देण्यात आलेले निमंत्रण स्वीकारले त्याबद्दल मी त्यांचा हृदयापासून आभारी आहे. त्यावर पंतप्रधानांनीही कृष्णम यांचे आभार मानले होते.

२२ जानेवारीला झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काँग्रेसने न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर कृष्णम यांनी त्यावर टीका केली होती. भगवान रामाच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास मुस्लिम आणि ख्रिश्चनांनीही नकार दिलेला नाही. राम हा भारताचा आत्मा आहे. रामाशिवाय भारताचा विचारही करता येणार नाही, असे तेव्हा कृष्णम म्हणाले होते.

Exit mobile version