‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपा अव्वल, तर फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पसंती

सर्वेक्षणानुसार भाजपाला १२३ ते १२९ जागा मिळण्याची शक्यता

‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपा अव्वल, तर फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पसंती

राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून जनतेच्या मतांचा कौल कोणाला मिळणार याकडे लक्ष असणार आहे. ‘न्यूज अरेना इंडिया’ने महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कसे निकाल लागतील, याचा अंदाज वर्तवला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपाला १२३ ते १२९ जागा मिळतील तर शिवसेना म्हणजेचं शिंदे गटाला २५ जागा मिळतील असा अंदाज लावण्यात आला आहे.

शनिवार, १७ जून हा सर्वेक्षण अहवाल समोर आला असून यात भाजपाला बहुमत दिसत असून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला २५ जागा मिळणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला ५५ ते ५६, काँग्रेसला ५० ते ५३ तर ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळतील, असं म्हणण्यात आलं आहे. इतर अपक्ष उमेदवारांना १२ जागा मिळू शकतील असा अंदाज आहे.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून निवडणुकीत भाजपाला आजवरच्या सर्वाधिक जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मतदानाची वेळ जवळ येईल तोपर्यंत अपक्ष किंवा इतर उमेदवारांचा आकडा वाढू शकतो, असंही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा संपूर्ण महाराष्ट्रातून मिळतील असंही म्हटलं जात आहे.

शिवाय बहुमत असलेल्या भाजपाकडे मुख्यमंत्री पद जाईल आणि भाजपा आपल्यासोबत अपक्ष- इतर आमदारांना सोबत घेऊन १४० च्या आसपास संख्याबळ वाढवेल असं स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपाला स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारांमुळे तब्बल ३५ टक्के जागा मिळू शकतात, असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षांना फायदा होईल, असंही म्हटलं आहे.

महाविकास आघाडीशिवाय कॉंग्रेसला २८ जागा जिंकणंही कठीण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. न्यूज अरेनाच्या मते,  एमआयएमला यावेळी एकाही जागेवर यश मिळणार नाही कारण, राज्यातील मुस्लीम मतदार महाविकास आघाडीसोबत आहेत, असे भाकीत करण्यात आले आहे. उद्वव ठाकरे यांना कोकणाबाहेर फारसा प्रतिसाद मिळणार नसल्याचं भाकीत देखील वर्तवण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

सिक्कीममध्ये पावसाचा तांडव, ३०० पर्यटकांना बाहेर काढण्यात यश

‘रॉ’च्या प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम शाखा करणार समान नागरी कायद्याचा प्रसार

‘डाकू हसिना’ला आवरला नाही १० रुपयांच्या फ्रुटीचा मोह अन्…

मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती?

न्यूज अरेनाच्या या सर्वेक्षणानुसार, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण व्हावेत यासाठी सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३५ टक्के, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना २१ टक्के, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना १४ टक्के, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १२ टक्के, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ९ टक्के मतदारांची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Exit mobile version