निलंबित सहायक निरीक्षक सचिन वाझेबाबत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मोठं विधान केलं आहे. “वाझेंची नियुक्ती होणार असल्याचं कळल्यानंतर मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांना वाझेंना पोलीस दलात घेऊ नका, अशी विनंतीही केली होती.” असा खळबळजनक खुलासा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अबू आझमी यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी वाझेच्या नियुक्तीवरून सरकारवर टीका करतानाच या सर्व प्रकाराला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगच जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ख्वाजा युनुस हत्येची केस सुरू असतानाही वाझेंना पोलीस दलात घेणं ही महाविकास आघाडीची सगळ्यात मोठी चूक होती, असं ते म्हणाले. तसेच मी सत्तेत असूनही सांगतो की, ज्या दिवशी वाझेंचा विषय विरोधकांनी हातात घेतला, त्याच दिवशी त्यांना निलंबित करायला हवं होतं. पण वाझेंना निलंबित करण्यात आलं नाही, ही सरकारची दुसरी मोठी चूक होती, असंही त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
कोरोनाची लागण झाल्यावर सचिन रुग्णालयात दाखल
अँटिलिया स्फोटके प्रकरणातील मिस्ट्री वुमन ताब्यात, सचिन वाझेसमोरच्या अडचणी वाढणार?
बंगाली दीदी विरुद्ध बिहारी बाबू
आता जम्मू-काश्मीरमध्येही ‘गोविंदा-गोविंदा’
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ मिळालेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएच्या हाती अजून एक अलिशान गाडी लागली आहे. सचिन वाझे वापरत असलेल्या ऑडी कारचा तपास एनआयएकडून गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. एनआयए आज वसई परिसरातून ही कार जप्त केली आहे. एनआयएने मंगळवारीच एक आऊटलॅंडर गाडीही नवी मुंबईच्या कामोठे परिसरातून जप्त केली आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तपास सुरु असलेली एमएच ०४ एफझेड ६५६१ नंबरची ऑडी आज एनआयएच्या हाती लागलीय.