अबू आझमी यांचे ठाकरेंशी फाटले

आमचा पक्ष सांप्रदायिक पक्षासोबत राहणार नाही...

अबू आझमी यांचे ठाकरेंशी फाटले

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला जबरदस्त नुकसान सहन करावे लागले. त्यातून मविआ आता फुटण्याच्या मार्गावर आहे. समाजवादी पक्षाने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

सपाचे आमदार अबू आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर सपाचे आमदार अबू आझमी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आझमी म्हणतात की, विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की आमचं हिंदुत्व कायम असेल, त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका मांडली नाही, त्यामुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादीनं ठरवायचं आहे की, त्यांच्यासोबत राहायचं की नाही? उबाठाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सहा डिसेंबरला बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केलं होतं, ते आझमी यांना बोचलेले आहे. त्या ट्विटनंतर हा वाद आणखी चिघळला आहे.

हे ही वाचा:

वॉलमार्टच्या वेबसाईटवर गणपतीचे चित्र असलेला स्विम सूट; हिंदूंच्या विरोधानंतर कंपनीचा माफीनामा

ढाकामधील इस्कॉनच्या केंद्राला समाजकंटकांकडून आग; मूर्ती, साहित्य जाळून खाक

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कळसाला मिळणार सुवर्ण झळाळी!

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विरोधी आमदारांचा शपथ घेण्यास नकार

आझमी म्हणाले की, राजकारणात धर्म आणणं ही चुकीची गोष्ट आहे. सहा डिसेंबरला आम्ही काळा दिवस म्हणून साजरा करतो. बाबरी मशिद त्या दिवशी तोडण्यात आली. पण उद्धव ठाकरे म्हणतात की, ज्या शिवसैनिकांनी हे केलं त्यांचा आम्हाला अभिमान आहे. असे वक्तव्य करणारे उद्धव ठाकरे जर सोबत असतील तर अशा आघाडीमध्ये समाजीवादी पार्टी राहाणं शक्यच नाही.

महाविकास आघाडी सेक्युलर होती. हिंदू, मुस्लिमांमध्ये कुठलाच फरक केला जात नव्हता. मात्र निवडणूक होताच उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्ही हिंदुत्वाच्या भुमिकेवर ठाम आहोत. आपल्या लोकांनी हिंदुत्व घेऊन चलावं.
ते पुढे बोलताना म्हणाले की, नाना पटोले आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. महाविकास आघाडी सेक्युलर आहे की सांप्रदायिक हे स्पष्ट करायला पाहिजे होतं. त्यामुळे त्यांना काय निर्णय घ्यायचा ते घेऊद्यात पण आमचा पक्ष सेक्युलर आहे, त्यामुळे तो सांप्रदायिक पक्षासोबत राहणार नाही.

Exit mobile version