तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मनात बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने समन्स पाठवले आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या सोबतच त्यांच्या पत्नीलाही समन्स पाठवण्यात आले आहे. गुरुवार, १७ मार्च रोजी पाठवण्यात आलेल्या ताज्या समन्सनुसार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजीरा यांची चौकशी होणार आहे. कोळसा घोटाळ्याशी संबंधित ही चौकशी असणार आहे.
या महिन्यात २१ आणि २२ मार्च रोजी या दोघांची चौकशी होणार आहे. या आधी गेल्या वर्षी अभिषेक बॅनर्जी यांची ईडी मार्फत चौकशी झाली होती. सप्टेंबर महिन्यात ६ तारखेला बॅनर्जी यांची चौकशी पार पडली होती. तब्बल सहा तास ही चौकशी चालली असून अभिषेक बॅनर्जी यांचा जबाब नोंदवण्यात आला. पण या चौकशीतून ईडीचे समाधान न झाल्यामुळे १० सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलवण्यात आले.
हे ही वाचा:
हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’
गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास
सीताराम कुंटेंची हकालपट्टी करा
काँग्रेस नेतृत्वावर ‘जी-२३’ क्षेपणास्त्राचा मारा
या समन्स विरोधात बॅनर्जी जोडप्याने दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. आम्ही पश्चिम बंगालचे रहिवासी असल्यामुळे आम्हाला ईडीने समन्स बजावू नये असा युक्तिवाद त्यांच्या मार्फत करण्यात आला. पण ११ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल देताना हे याचिका रद्द ठरवली आहे. त्यामुळे आता ईडीने या प्रकरणात सक्रिय होत अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले आहे.
२०२० साली या प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केली असून त्याच्या आधारेच ईडीने या विषयात प्रेव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.