जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. अब्दुल्ला यांच्यावर जम्मू-काश्मीर क्रिकेट मंडळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. जप्त केलेल्या मालमत्तेचे किंमत ११ कोटी ८६ लाख रुपये आहे. यात दोन स्थावर मालमत्ता असून, एक निवासी तर दुसरी व्यवसायी स्वरूपाची आहे. सोबतच तीन जमिनीचे तुकडेही आहेत. ११ कोटी ८६ लाख हे या मालमत्तेची कागदोपत्री किंमत असून त्यांचा बाजारभाव ६० ते ७० कोटी आहे.
अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीर क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात ११३ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. हा निधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे पाठवण्यात आला होता. या संदर्भात अब्दुल्ला यांची ईडी मार्फत अनेकदा चौकशी झाली आहे. अब्दुल्लांवर प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंडरिंग ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि फारूक अब्दुल्ला यांचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला यांनी या कारवाईला ‘बिनबुडाचे’ म्हटले आहे. “आम्ही आमच्या वकिलांच्या संपर्कात आहोत आणि आम्ही या बिनबुडाच्या आरोपांविरोधात न्यायालयात लढा देऊ” असे अब्दुल्ला म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटर वरून भाजपा वर टीकास्त्र डागले आहे.