आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पर्याय म्हणून देशातील अनेक विरोधकांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ नावाची आघाडी उघडली आहे. या आघाडीमध्ये त्यांच्या लोगो वरून आणि जागा वाटपावरून अद्याप एकमत नसल्याच्या चर्चा आहेत. तसेच पंतप्रधान पदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. अशातच आम आदमी पार्टीने पंजाबमधील आपली भूमिका स्पष्ट करत इंडिया आघाडीला दणका दिलेला आहे.
पंजाब सरकारमधील मंत्री अनमोल गगन मान यांनी बुधवार, ६ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची घोषणा केली आहे. पंजाबच्या १३ जागांवर आम आदमी पार्टी स्वतंत्र लढणार असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारे आम्ही जागा वाटप करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
“आम्ही काँगेससोबत कोणतीही आघाडी करणार नाही. भगवंत मान यांच्यावर पंजाबचे लोक प्रेम करतात, लोकांनी इमानदार माणसाची निवड केली आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी होणं शक्य नाही,” असे मंत्री अनमोल गगन मान यांनी सांगितले. पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवणार आहे. तसेच आम आदमी पक्षाच्या चिन्हावरचं निवडणुका लढवल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम आदमी पक्ष कसल्याही प्रकारच्या वाटाघाटी करणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. ‘न्यूज १८ हिंदी’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. आम आदमी पक्षाच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र असल्याच्या चर्चांना आता जोर आला आहे.
हे ही वाचा:
किशोरी पेडणेकर यांना अटक होणार? आर्थिक गुन्हे शाखेने ११ तारखेला बोलावले
सोमय्या प्रकरणी ‘लोकशाही’चे कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा
सरकार तर पडत नाही; निदान राजीनामे तरी द्या!
रोव्हर प्रज्ञानने घेतली चंद्राची रंगीबेरंगी छायाचित्रे
‘इंडिया’ आघाडीच्या आतापर्यंत पाटणा, बंगळूरू आणि मुंबईत तीन बैठका झालेल्या आहेत. मुंबईतील बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून आता आघाडीच्या मोठ्या बैठका होणार नाहीत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. समन्वय समितीच्याचं बैठका होणार आहेत, असं ते म्हणाले.