आप म्हणजेच आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरावर सोमवारी सकळी ईडीने छापेमारी केली होती. यानंतर त्यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने त्यांच्या घरावर छापा मारला त्यानंतर काही तास त्यांच्या घरी तपास सुरु होता. दिल्लीतल्या कथित वक्फ घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
अमानतुल्लाह खान हे आम आदमी पार्टीचे आमदार असून दिल्लीतल्या ओखला या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. दिल्ली वक्फ बोर्डाच्या संचालक पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला त्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. सोमवारी सकाळी ईडीच्या पथकाने अमानतुल्लाह यांच्या घराची झडती घेतली. काही तास या ठिकाणी झडती घेतल्यानंतर ईडीने अमानतुल्लाह यांना अटक केली.
आमदार अमानतुल्ला यांनी याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या घरावरील कारवाईची माहिती दिली. सकाळी ७ वाजता ईडीचे लोक घरी आल्याचा उल्लेख त्यांनी केला. ईडीचे लोक सर्च वॉरंटच्या नावावर अटक करायला आल्याचेही त्यांनी म्हटले होते. ईडीच्या सर्व नोटिसांना उत्तर दिले असून त्यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत, असं अमानतुल्ला यांनी म्हटले होते.
हे ही वाचा:
‘IC814- द कंदहार हायजॅक’ वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपविली?
बांगलादेशात दुर्गापूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तीचे विटंबन
निषाद कुमारची २.०४ मीटर ‘उंच उडी’ मारत रौप्य पदकाला गवसणी
पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने पटकावले आणखी एक कांस्य पदक
अमानतुल्ला खान विरुद्ध ईडीचा खटला २०१८ ते २०२२ दरम्यान बेकायदेशीररीत्या कर्मचाऱ्यांची भरती आणि वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर अन्यायकारकपणे भाडेतत्त्वावर दिल्याच्या आरोपांवर आधारित आहे. याचा परिणाम म्हणजे बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा त्यांना झाला आहे. ईडीने या प्रकरणा संदर्भात अमानतुल्ला खान यांची १२ तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती. ईडीने दावा केला आहे की, या बेकायदेशीर कृत्यांमधून अमानतुल्ला यांनी मोठी रक्कम मिळवली असून यातून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावे स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, दिल्ली उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांकडून वारंवार समन्स चुकवल्याचा दाखला देत मार्चमध्ये अमानतुल्ला खान यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना अटकेपासून संरक्षण नाकारले होते.