मंगळवार १८ जानेवारी रोजी आम आदमी पक्षातर्फे पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने आगामी निवडणूकीसाठी आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला आहे. खासदार भगवंत मान यांना पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. त्यामुळे जर पंजाबमध्ये ‘आप’ ची सत्ता आली तर भगवंत मान मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. बहुतांश लोकांनी भगवंत मान यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली असल्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचे आम आदमी पक्षातर्फे सांगण्यात येत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षातर्फे राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा याला घेऊन एक जनमत चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये भगवंत मान यांना २१ लाख लोकांनी पसंती दिली होती. एकूण मतदानापैकी ९३ टक्के पसंती भगवांत मान यांना मिळाली होती. त्यामुळेच भगवान मान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘नानाभाऊ शारीरिक उंची असून चालत नाही, बौद्धिक उंची पण हवी’
किरण माने प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री
‘भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ’
प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदी यांना धोका; गुप्तचर यंत्रणांकडून माहिती
या आधी २०१७ च्या पंजाब निवडणुकांमध्येही भगवंत मान यांच्या नावाची चर्चा जोरदार रंगताना दिसत होती. पण त्यावेळी आम आदमी पक्षातर्फे मुख्यमंत्री पदासाठी कोणताच चेहरा दिला गेला नव्हता. पण आता यंदाच्या निवडणुकीत मात्र पक्षाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून निवडणुका लढण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात मंगळवार १८ जानेवारी रोजी चंदीगड येथे पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांनी स्वतः या पत्रकार परिषदेला संबोधित केले. पंजाब साठी हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे या वेळी केजरीवाल यांनी म्हटले. केजरीवाल यांनी काही महिन्यांपूर्वी हे सांगितले होते की पंजाब निवडणुकीसाठी आभ आदमी पक्ष असा एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे आहे त्याच्यावर सार्या राज्याला गर्व असेल. त्यानुसार त्यांनी मान यांचे नाव पुढे केले आहे.