हरियाणा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच भाजपाला टक्कर देण्यासाठी म्हणून देशपातळीवर एकत्र आलेली इंडी आघाडीमधील घटक पक्ष हरियाणामध्येही एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युती होणार अशा राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, अशातच आता या दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या चर्चेवरून बिनसल्याचे चित्र असल्याचे समोर आले आहे.
आम आदमी पार्टीने हरियाणासाठी २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसला सांगितले होते की, काँग्रेसने युतीबाबत वेळेत निर्णय न घेतल्यास आम्ही यादी जाहीर करू. पुढे काँग्रेसकडून आघाडीबाबत कोणतेही संकेत न मिळाल्याने अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यावरून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत एकमत होऊ शकले नसल्याचे दिसून आले आहे. माहितीनुसार, आप १० जागांची मागणी करत असताना काँग्रेस केवळ सात जागा देण्यास तयार होती. काँग्रेस नेते दीपक बाबरिया आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्यातील चर्चा सकारात्मक दिशेने जात असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्यांना आता पूर्णविराम मिळालेला आहे.
हे ही वाचा :
शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा !
‘सनातन धर्म…’ च्या मराठी आवृत्तीचे लालबागच्या राजाच्या दरबारी प्रकाशन
कर्नाटकातील कलबुर्गीत राममंदिराच्या संकल्पनेवरील श्रीगणेश !
आता ‘IC814- द कंदहार हायजॅक’ वर ‘एएनआय’ कडून खटला
हरियाणा विधानसभेची यंदाची मुदत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. त्याआधीच नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असल्यामुळे त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, हरियाणामध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. ९० जागा असलेल्या हरियाणा विधानसभेची निवडणूक ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर, जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.