राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी काल, २४ जुलै रोजी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली होती. बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यानंतर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी या व्हिडीओत म्हटलं की, “बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल बोलताना काल शरद पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. यानंतर आम्ही शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुक करतानाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला होता. दरम्यान, आम्हाला आज शरद पवार यांचा १९७४ सालचा पत्रव्यवहार सापडला आहे. त्यावेळी मुंबईतील तत्कालीन शिवसृष्टी पाहिल्यानंतर शरद पवार यांनी लेखी स्वरुपात बाबासाहेब पुरंदरे यांचं प्रचंड कौतुक केलं होतं,” असे आनंद दवे म्हणाले.
“त्या पत्रात शरद पवारांना बाबासाहेब पुरंदरे हे शिवचरित्रकार, शिवअभ्यासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त वाटत आहेत. मात्र, काल त्यांना बाबासाहेब पुरंदरे हे शिवाजी महाराजांवर अन्याय करणारे दिसले. त्यामुळे आम्हालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की शरद पवार नेमके कोणते आहेत? १९७४ साली कौतुक करणारे की कालचे टीका करणारे? शरद पवार यांनी पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे असो वा समर्थ रामदास स्वामी असो यांच्याविषयीची भूमिका स्पष्ट करावी” अशी मागणीही आनंद दवे यांनी केली आहे.
हे ही वाचा:
ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!
मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!
अग्निपथमध्ये नौदल प्रवेशासाठी महिलांची पसंती
दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही
इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी शरद पवार बोलत होते.