पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण प्रेमींना लिहिलेल्या खुल्या पत्राच्या रूपाने केलेल्या जाहिरातबाजीवर भाजपाने जोरदार टीका केली आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ही पानभर जाहिरात तमाम वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांच्या त्या पत्रासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचीही थोडक्यात मनोगते आहेत. पण ही सगळी पर्यावरणाच्या नावाने केलेली नौटंकी आहे, अशी घणाघाती टीका भाजपाने केली आहे.
भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, पर्यावरण प्रेमाचे नाटक वठवणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या अज्ञानामुळे खरे तर पर्यावरणाला धक्का पोहोचला. मेट्रोमुळे वर्षाला १ लाख टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखले जाते. पण प्रकल्प लांबवल्याने मुंबईकरांच्या फुफ्फुसांमध्ये कार्बन भरला आहे. हे सगळे बोगस पर्यावरणवादी आहेत.
मुंबईतील प्रदूषणावर अक्सीर मात्रा असलेला मेट्रो-३ प्रकल्पाचा बळी घेणारे पर्यावरण मंत्री @AUThackeray यांनी मुंबईकरांकडून मोकळा श्वास घेण्याची संधी हिरावून घेतली आहे. pic.twitter.com/uEsvdXNhmf
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 5, 2021
भातखळकर पुढे म्हणतात, गेल्या वर्षभरात मुंबई महानगरपालिकेने २५ हजार झाले तोडण्याची परवानगी दिली. तर याच आरे कॉलनीत जिथे मेट्रोचे काम थांबवले गेले तिथे एसआरएला परवानगी दिली, इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी दिली, रस्ता बनविण्यासाठी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये ८ हेक्टर जागाही मागितली आहे. त्यामुळे पर्यावरण दिनाच्या दिवशी पत्र लिहिल्यामुळे तुमचे पर्यावरण प्रेम खरे आहे, हे लोक समजणार नाहीत.
भाजपा मुंबईनेही आदित्य ठाकरे यांच्या बेगडी पर्यावरणप्रेमावर प्रहार केला आहे. पर्यावरणदिनानिमित्त सरकारने वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती छापल्या आहेत. सरकारी पैशाने लेकाची जाहिरातबाजी करायला महाराष्ट्र सरकार म्हणजे काय मुख्यमंत्र्यांची खासगी मालमत्ता आहे काय? असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पर्यावरणदिनानिमित्त सरकारने वर्तमानपत्रांमध्ये पर्यावरणमंत्री @AUThackeray यांच्या पानभर जाहिराती छापल्यात. सरकारी पैशांनी लेकाची जाहिरातबाजी करायला महाराष्ट्र सरकार म्हणजे काय मुख्यमंत्र्यांची खासगी मालमत्ता आहे काय? #बोगस_पर्यावरणवादी pic.twitter.com/pSIai4JDIo
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) June 5, 2021