लोकसभा निवडणूकीचे आता दोन टप्पे उरले असून या टप्प्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. आता सहाव्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हरियाणातील महेंद्रगड येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाषणातून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
काँग्रेसला दिलेलं मत वाया जाणार
नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, “काँग्रेसचे सरकार सात जन्मातही बनणार नाही. काँग्रेसला दिलेले मत व्यर्थ जाईल. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी तुम्हाला कोणाला मतदान करायचे हे पहावे लागेल. कोणाचे सरकार स्थापन होणार हे प्रत्येक मुलाला माहीत आहे. २४ व्या निवडणुकीत काँग्रेसचे सत्य संपूर्ण देशाला कळले आहे. या लोकांनी व्होट बँकेसाठी देशाची फाळणी केली. एक भारत आणि दोन मुस्लिम राष्ट्रे निर्माण केली. आता उरलेल्या भारतावरही मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असे ते म्हणत आहेत,” अशी घाणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.
इंडी आघाडीचा ढोल पाच टप्प्यात फुटलाय
“देशातील लोकांना इंडी आघाडीचा हेतू पूर्वीच कळला आहे. इंडी आघाडीचा ढोल अवघ्या पाच टप्प्यात फुटला आहे आणि म्हणूनचं ते तिसऱ्या टप्प्यानंतर रडू लागलेत. निवडणूक आयोग आकडे का देत नाही? निवडणूक आयोग असे का करतो? अशी रडारड सुरू आहे,” असा निशाणा नरेंद्र मोदी यांनी इंडी आघाडीवर साधला आहे.
हे ही वाचा:
आरोपी विशाल अग्रवाल म्हणतो, मुलाला गाडी देऊन चूक केली!
सीतारामन म्हणतात, एनडीए सरकारच पुन्हा सत्तेवर येणार!
पुण्यासारखीच जळगावात घटना, अपघातात चार जणांचा मृत्यू, आरोपी मोकाट!
डोंबिवलीच्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या
काँग्रेस राम मंदिराला कुलूप ठोकण्याची योजना आखतेय
काँग्रेसची सत्ता असेल तर हरियाणात रामाचे नाव घेणाऱ्यांना अटक होईल. काँग्रेसला संपूर्ण देशातून राम हटवायचा आहे. काँग्रेस सत्तेत असेपर्यंत राम मंदिर होऊ दिले नाही. काँग्रेसने तर राम मंदिर प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार टाकला होता. आता राजकुमारच्या सल्लागाराने आणखी एक मोठा खुलासा केला आहे की, काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराला कुलूप ठोकण्याची योजना आखली जात आहे, अशी घाणाघाती टीका नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे.
“काँग्रेस १० वर्षांपासून सत्तेबाहेर आहे, त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. काँग्रेस केवळ आमच्या श्रद्धेचाच नाही तर आमच्या तिरंग्याचाही अपमान करत आहे. ७० वर्षे काश्मीरमध्ये तिरंगा कोणी फडकवू दिला नाही? आज हे लोक म्हणत आहेत, सत्तेत आल्यास पुन्हा ३७० लादतील,” अशी टीकाही नरेंद्र मोदी यांनी केली.