“डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करताना बुद्धिमत्ता आणि विनम्रतेचे दर्शन घडायचे”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

“डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करताना बुद्धिमत्ता आणि विनम्रतेचे दर्शन घडायचे”

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात गुरुवारी रात्री निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तम अर्थतज्ज्ञ आणि त्यांचा शांत स्वभाव यामुळे ते विशेष प्रसिद्ध होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले.

सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर भारत सरकारच्या वतीने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच सरकारद्वारे आयोजित सर्व कार्यक्रम सात दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय कॅबिनेट मंडळाची बैठक शुक्रवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असून या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. तर, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशातील सर्व दिग्गजांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर त्यांचे आणि सिंग यांचे काही फोटो पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. “देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल भारत शोक व्यक्त करतो आहे. सामान्य पार्श्वभूमी असलेले डॉ. मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत. पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले.” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पुढे नरेंद्र मोदी यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. “मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आमच्यात नेहमी सुसंवाद होत असे. शासनाशी संबंधित अनेक विषयांवर आम्ही चर्चा करत असू. यावेळी त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता पाहायला मिळायची. या दुःखद प्रसंगी मी डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो,” अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. “मनमोहन सिंग यांनी मोठ्या निष्ठेने भारताचे नेतृत्व केलं. त्यांची नम्रता आणि त्यांना असलेली अर्थशास्त्राची जाण, यामुळे संपूर्ण देशाला प्रेरणा मिळाली. मी आज एक गुरु आणि मार्गदर्शक गमावला आहे. श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो. डॉ. मनमोहन सिंग कायम स्मरणात राहतील,” असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहत शोक व्यक्त केला आहे. अमित शाह यांनी लिहिले आहे की, “डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकचे गवर्नर ते देशाचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. या दुःखाच्या वेळी त्यांच्या परिजन आणि समर्थकांप्रति संवेदना व्यक्त करतो. वाहेगुरुजी त्यांच्या आत्म्याला सद्गति प्रदान करा आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्या.”

Exit mobile version