तृणमूल काँग्रेसने काँग्रेसच्या पाच सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समितीची भेट न घेण्याचे संकेत दिल्याने पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपाची शक्यता आणखी धूसर झाली आहे. टीएमसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने याआधीच काँग्रेसला त्यांचा प्रस्ताव कळवला आहे.
काँग्रेसच्या समितीमध्ये अशोक गेहलोत, भूपेश बघेल, मुकुल वासनिक, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाशसारख्या नेत्यांचा सहभाग होता. या समितीने याआधी समाजवादी पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलासारख्या पक्षांशी चर्चा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला मालदा दक्षिण आणि बहरामपूरची जागा देण्याची तयारी दर्शवली होती. सध्या या दोन्ही जागा काँग्रेसकडेच आहेत.
पश्चिम बंगालचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी याआधीच हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. या दोन्ही जागा काँग्रेसने सन २०१९मध्ये तृणमूल आणि भाजप या दोन्ही पक्षांविरोधात स्वतःच्या हिमतीवर लढून जिंकल्या होत्या. काँग्रेसला या दोन्ही जागा जिंकण्यासाठी ममता यांच्याकडून कोणत्याही दानशूरपणाची आवश्यकता नाही. आता तृणमूल काँग्रेस या प्रस्तावावर काँग्रेस समितीशी चर्चा करण्यास उत्सुक नाही. तर, तृणमूल पक्षानेही त्यांची बाजू मांडली आहे.
हे ही वाचा:
धक्कादायक! शरद मोहोळच्या हत्येची वकिलांना होती माहिती
गावातून पळून गेलेले जोडपे मुलासह पुन्हा परतले, तिघांची गोळ्या घालून केली हत्या!
अजित पवार जाणार अयोध्येला, निमंत्रण मिळाले!
‘आम्ही त्यांना दोन जागांचा प्रस्ताव दिला आहे. बंगालमधील ४२ जागांपैकी केवळ दोन जागांवर काँग्रेसला ३० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ते अधिक जागा कसे काय मागू शकतात? काँग्रेसच्या ज्येष्ठ नेतृत्वाने थेट ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली तर त्या आणखी एक जागा देतील. त्यामुळे काँग्रेस आघाडी समितीला भेटण्यात काही अर्थ नाही. आमचा प्रस्ताव स्पष्ट आहे,’ असे तृणमूलच्या एका नेत्याने सांगितले. काँग्रेसला बंगालमध्ये रायगंज, मालदा उत्तर, जंगीपूर आणि मुर्शिदाबादसह आणखी काही जागा हव्या आहेत.