लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला पुन्हा एक जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार नवीन जिंदल यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या केल्या त्यांना पक्षाने हरयाणातील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीही जाहीर केली.
‘मी १० वर्षे कुरुक्षेत्रमधून खासदार म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व केले. मी काँग्रेसचे नेतृत्व आणि तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आभार मानतो. आज मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे,’ असे नवीन जिंदल यांनी ‘एक्स’वर जाहीर केले.
भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर नवीन जिंदल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘माझ्या जीवनातील हा मोठा महत्त्वाचा दिवस आहे. मी आज भाजपमध्ये सहभागी झालो आहे, याचा मला अभिमान आहे आणि आता मी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सेवा करू शकेन. पंतप्रधान मोदी यांच्या ‘विकसित भारत’ स्वप्नासाठी योगदान देण्याकरिता मीही खांद्याला खांदा लावून योगदान देऊ इच्छितो. भाजपने मला त्यालायक समजल्याबद्दल मी भाजपच्या नेतृत्वाचा आभारी आहे,’ असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील तीन उमेदवार
अभिनेत्री कंगना रणौत, अरुण गोविल भाजपच्या पाचव्या यादीत!
उज्जैनमधील महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान आग; पुजाऱ्यासह १३ जण जखमी
तांबड्या समुद्रात भारतीय नौदलाची करडी नजर, चाच्यांना ‘मामा’ बनवणार
‘मी गेली १० वर्षे काँग्रेससोबत होतो. मी पक्षात सक्रिय नव्हतो. गेल्या १० वर्षांत त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी झालो नाही. तसेच, काही काळापासून मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हतो. माझे लक्ष्य केवळ माझे काम, सामाजिक कार्य आणि विद्यापीठावर होते. त्यामुळे माझ्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला काही फरक पडेल, असे वाटत नाही. माझ्यावर तिथे ना कोणती जबाबदारी होती ना मी तिथे कोणत्या पदावर होतो,’ असे ते म्हणाले.