शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केलं. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. त्यानंतरही शिवसेनेतील गळती सुरूच असून आता शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. संघटनेत फूट पडू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दुसरीकडे शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. आमदारांपाठोपाठ आता शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसत आहे.
शाखा क्रमांक ३ चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि शाखा क्रमांक १२ चे शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामणकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला. आता शाखाप्रमुखांनी राजीनामा दिल्याने राजीनामा सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागाठाणे विभागातील दोन शाखाप्रमुखांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.
शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस यांना कौस्तुभ म्हामणकर यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय घडामोडी आणि ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी असलेले माझे घनिष्ठ संबंध पाहता प्रभागातील पदाधिकारी व शिवसैनिक माझ्याकडे नाहक संशयाने पाहत आहेत. परस्परात संभ्रमाचे वातावरण तयार करून माझ्याबाबतीत चुकीचे संदेश पोहचवत आहे. मी याकारणाने माझ्या शाखा प्रमुखपदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे,”
हे ही वाचा:
एकनाथ शिंदे-शरद पवार भेट झालीच नाही!
नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक
शिवसेनेला पुण्यातही मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे.