एकीकडे इम्रान खान सरकारने हिंदू मंदिर बांधायला परवानगी देऊन धर्मस्वातंत्र्याचा बुरखा पांघरायचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच इम्रानचा हा बुरखा फाडला आहे. पाकिस्तानच्या खैबर-पख्तुन्वा प्रांतात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. खैबर-पख्तुन्वाच्या करक जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
करक जिल्ह्यातील एका स्थानिक मौलवीने मुस्लिम समाजाला हिंदूंविरोधी चिथावणी दिली. परिणामी माथेफिरू जमावाने हिंदू मंदिरावर हल्ला चढवला. या मौलवीला स्थानिक फुफुटीरतावाद्यांचा पाठिंबा आहे.
पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्ता इंतेशाम अफगाण याने या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेला निंदनीय म्हणत यावरून पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची काय अवस्था आहे याचा अंदाज येतो असे अफघाणने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
इम्रान खानच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचा स्थानिक नेता लाल चंद माल्हीने या घटनेला ‘दुर्दैवी’ म्हटले आहे. माल्हीच्या म्हणण्यानुसार तो करकच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलला असून त्यांना या प्रकरणात एफआयआर दाखल करायच्या सूचना दिल्या आहेत. पण अद्याप या प्रकरणात एकही एफआयआर दाखल करण्यात आला नाहीये. पोलिसांनी दोषींना अटक करायचे आश्वासन दिल्याचेही माल्ही सांगतो. पण या प्रकरणातील मुख्य आरोपी मौलाना शरीफ मोकाट फिरत आहे.