निवडणूक आयोगावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या भाई जगतापांविरोधात तक्रार दाखल

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली माहिती

निवडणूक आयोगावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या भाई जगतापांविरोधात तक्रार दाखल

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास आठवडा उलटला असून अजूनही महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून ईव्हीएमला दूषणं देण्याचं काम सुरू आहे. महायुतीला मिळालेल्या यशामध्ये निवडणूक आयोगाचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार भाई जगताप यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली. केंद्रीय निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय, असं विधान भाई जगताप यांनी केलं. यामुळे आता त्यांच्यावर टीका होत आहे.

दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भाई जगताप यांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाल ‘कुत्रा’ शिवी दिल्याबद्दल काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधीचे पत्र पोस्ट करत माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना भाई जगताप यांची जीभ घसरली. केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगताप म्हणाले की, आपली लोकशाही खूप मोठी आहे. ती जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. या लोकशाहीवर जर काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर त्याचं उत्तर हे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. निवडणूक आयोग तर कुत्रा आहे. पण लोकशाहीला सशक्त बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सगळ्या संस्था कुत्रा बनून नरेंद्र मोदींच्या दारासमोर बसतात, असं भाई जगताप म्हणाले.

हे हि वाचा:

बांगलादेशच्या चितगावमध्ये तीन हिंदू मंदिरे लक्ष्य!

‘फेंगल’ चक्रीवादळ तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या किनारी भागात धडकणार!

चॅम्पियन्स ट्रॉफीवर तोडगा काढण्यासाठी आयसीसीची बैठक आज!

काँग्रेसमध्ये संघाचे स्वयंसेवक किती?

दरम्यान, भाई जगताप यांनी केलेल्या या वक्तव्यावर सर्वच स्तरावरून टीका करण्यात येत आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही या विधानावरून भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाचाळवीरांसारखं बोलणं सुरू आहे. त्यामुळे तेच भुंकताना दिसत आहेत. भुंकण्यासारखी त्यांची वक्तव्यं आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना त्यादृष्टीनं तसंच दिसणार.

Exit mobile version