बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

व्यावसायिकाकडून एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप

बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

बिहारमधील पूर्णियामधून अपक्ष निवडणूक जिंकलेल्या पप्पू यादव (राजेश रंजन) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पप्पू यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णियातील एका मोठ्या फर्निचर व्यावसायिकाने खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. पप्पू यादव यांनी या व्यावसायिकाकडून एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फर्निचर व्यावसायिकाने तक्रारीत म्हटले आहे की, ४ जून रोजी मतमोजणीच्या दिवशी पप्पू यादव यांनी व्यावसायिकाला आपल्या घरी बोलावले होते. जेव्हा व्यावसायिक पप्पू यादव यांच्या घरी गेले, तेव्हा त्यांच्याकडे पप्पू यादव यांनी एक कोटी रुपये मागितले. तसेच, पप्पू यादव यांनी केवळ पैसेच मागितले नाही तर व्यावसायिकाला धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पैसे दिले नाही तर ठार मारले जाईल, अशी धमकी पप्पू यादव यांनी दिल्याचे म्हटले आहे. याशिवाय, पप्पू यादव यांनी पुढील पाच वर्षे पूर्णियाचा खासदार राहणार असल्याचे सांगत आपल्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास सांगितल्याचे व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘भारताकडून नेहमीच सुरक्षा आणि शांततेला महत्त्व’

मलावीच्या उपराष्ट्रपतींना घेऊन जाणारे विमान बेपत्ता

शीख समुदायाबाबत कामरान अकमलने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा हरभजन सिंगने घेतला समाचार

आस्था जिहादविरुद्ध त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू एकटवला

दरम्यान, एका फर्निचर व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर अपक्ष खासदार पप्पू यादव आणि त्यांचे निकटवर्तीय अमित यादव यांच्याविरोधात मोफसिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पप्पू यादव यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या राजकारणातील माझा वाढता प्रभाव आणि सर्वसामान्यांच्या वाढत्या आपुलकीमुळे नाराज झालेल्या लोकांनी आज पूर्णियामध्ये एक घृणास्पद कट रचला आहे. एका अधिकाऱ्याचे आणि विरोधकांचे हे षडयंत्र पूर्णपणे उघड होईल. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत निष्पक्ष तपास व्हावा आणि जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी, असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे.

Exit mobile version