ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईतील एन एम जोशी पोलीस ठाण्यात शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला. बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केल्या प्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील लोअर परळ उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरु करण्यात आली होती. परंतु, दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरू होते. हा पूल सुरू करण्यासंदर्भात यापूर्वी अनेकवेळा डेडलाइन देण्यात आल्या होत्या. परंतु, पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अजूनही पूर्ण झाले नव्हते. तरीही गुरुवारी ठाकरे गटाकडून उद्घाटन करण्यात आले. अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्धघाटन केले आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर लोअर परेल पुलाच उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पालिकेचे दोन अधिकारी एन एम जोशी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी दाखल झाले होते. पोलिसांनी या दोन अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुलाचे काम अपूर्ण असताना बेकायदेशीपणे उद्घाटन कसे केले? आम्ही तीन, चार दिवसांत काम पूर्ण करुन ही मार्गिका सुरु करणार होतो, अशी भूमिका मुंबई पालिकेने घेतली आहे.
मुंबई महापालिकेचे म्हणणे काय?
महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई यांच्या पूर्वपरवानगी शिवाय काम अपूर्ण असलेल्या लोअर परेल ब्रिजच्या सुरुवातीला एसीक भवन समोर लावलेले बॅरिगेट काढून ब्रिजवर अतिक्रमण करून आदित्य ठाकरे आणि त्यांचे सहकारी तसेच कार्यकर्ते चालत ब्रिजच्या मध्यापर्यंत पोहचले होते. पायी चालत जाऊन त्यांनी वाहतुकीला तयार नसलेला दक्षिण वाहिनी पूल हा वाहतुकीसाठी अनधिकृतरित्या खुला केला. त्यामुळे ब्रिजवरून वाहतूक सुरू झाली आणि त्यावरून काही वाहन जाऊन वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
हे ही वाचा:
दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय
श्रीलंका सरकारकडून बीसीसीआय सचिव जय शहांची माफी
‘ऑपरेशन काली’ अंतर्गत पाच दहशतवाद्यांचा खात्मा
एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर आणि स्नेहल आंबेकर हे मुख्य आरोपी आहेत. तसेच इतर १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम १४३ (बेकायदेशीर जमाव जमवणे), १४९ (समान उद्दिष्ट साधण्यासाठी जमाव जमवणे), ३३६ (लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे), ४४७ (गुन्हेगारी उद्देशाने केलेले अतिक्रमण) या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.