औरंगाबाद शहरात एक वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. आगामी औरंगाबाद महापालिका निवडणूक लढवण्याची एका व्यक्तीला तीव्र इच्छा असल्याचे त्याच्या युक्तीतून स्पष्ट झाले आहे. या इसमाला तीन अपत्य असल्यामुळे तो निवडणूक लढवू शकत नाही त्यामुळे या पठ्ठ्याने निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, अशा आशयाचे बॅनरच लावले आहेत.
रमेश विनायकराव पाटील असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या या बॅनरची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. या बॅनरवर त्यांनी बायको कशी हवी हेसुद्धा लिहिले आहे. पाटील यांचा प्लॉटिंग चा व्यवसाय आहे.
स्थानिक माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये मला तिसरे अपत्य झाले. त्यामुळे मी निवडणूक लढवण्यासाठी पात्र नाही. माझ्या कुटुंबातील एका व्यक्तीने निवडणूक लढवावी आणि समाजाचे प्रश्न सोडवावेत असे माझे मत आहे. त्यामुळे मला निवडणूक लढवणारी बायको हवी आहे. बॅनर लावल्यानंतर तीन चार फोन देखील मला आले. दोन-तीन दिवसात आणखी फोन आल्यानंतर जी लोकांची सेवा करण्यास योग्य असेल अशा महिलेची निवड करण्यात येईल. माझ्या घरातून देखील या निर्णयाला मला पाठिंबा आहे. असे पाटील म्हणाले.
हे ही वाचा:
जीवाच्या भीतीने कॅनडाचे राष्ट्रपती अज्ञातवासात
‘दंगल ऑफ क्राईम’….कुस्तीपटू सुशील कुमारवर माहितीपट
पंतप्रधान मोदींनी घेतली कॉलर वाली वाघीण आणि ‘विराट’ची दखल
‘संजय राऊत यांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक’
उमेदवार बायको कशी असावी?
रमेश पाटील यांनी लिहलेले बॅनर अतिशय मजेदार आहे. त्यांनी बॅनरवर पत्नीचे वय तसेच ती कशी असावी याविषयी सविस्तर लिहिले आहे. ‘मला तीन मुले असल्यामुळे मी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी मला उमेदवार बायको पाहिजे. जातीची अट नाहीये. मुलीचे वय २५ ते ४० वर्षादरम्यान असावे. विधवा तसेच घटस्फोटीत मुलगीदेखील चालेल. लग्नासाठी उत्सुक असलेल्या मुलीला दोनपेक्षा जास्त अपत्य नसावे. असे पाटील यांनी त्यांच्या बॅनरमध्ये लिहले आहे.