देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता सध्या जामीनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. इंडी आघाडीतील त्यांच्या युतीबाबत त्यांनी भाष्य केले आहे. इंडी आघाडीतील घटक पक्षांमध्ये सारं आलबेल नसल्याचं यापूर्वीही बोललं जात होतं. मात्र, आता पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यामुळे हे चित्र स्पष्ट झाल्याच्या चर्चा आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दिल्ली लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवली असूनही ‘आप’ची काँग्रेससोबतची युती कायम नाही. इंडिया टुडेच्या राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल म्हणाले की, ४ जून रोजी एक ‘मोठं आश्चर्य’ वाट पाहत आहे कारण इंडी आघाडी लोकसभा निवडणुकीत जिंकेल. मी काँग्रेससोबत कायमचा विवाहबंधनात नाही. सध्या भाजपाचा पराभव करणे हे आमचे ध्येय आहे,” असे मत केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी म्हणून दिल्लीत आप आणि काँग्रेस यांची युती आहे, तर शेजारच्या पंजाबमध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहेत. त्यांच्या या विधानामुळे आता पुन्हा चर्चा रंगण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीचं ममता यांच्या तृणमूल काँग्रेसने एकला चलो हा नारा देत निवडणूक स्वतंत्र लढण्याचे ठरवले होते. दरम्यान, आता काही दिवसांपूर्वी इंडी आघाडी सत्तेत आल्यास आपला बाहेरून पाठींबा असेल अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यांच्या या संभ्रम निर्माण करणाऱ्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्हे निर्माण झाली होती. अशातच आता अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेमुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी संदेशखालीच्या महिलांना केला सलाम!
उत्तर भारतात उष्म्याचा कहर; दिल्लीत तापमान ५० अंश सेल्सिअसजवळ!
राजकोट गेमिंग झोनमधील आगीत मालकाचाही मृत्यू!
‘पाकिस्तानने भारताशी केलेल्या १९९९च्या लाहोर कराराचे उल्लंघन केले’
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “घाबरणार नाही आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझे तुरुंगात जाणे हा मुद्दा नाही. या देशाचे भवितव्य धोक्यात आहे. भाजपला हवे आहे म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असं केजरीवाल म्हणाले आहेत.