नागपूर,अकोला निवडणूकीत आघाडीची ९६ मतं फुटली

नागपूर,अकोला निवडणूकीत आघाडीची ९६ मतं फुटली

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूरच्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली असून त्यांनी नागपूरच्या जागेवर बाजी मारली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७८ मतांचा कोटा पूर्ण केला आहे. याच विजयावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीची ९६ मतं फुटली असल्याचा दावा शेलार यांनी केला आहे.

“नागपूर,अकोला निवडणूकीत आघाडीची ९६ मतं फुटली. तिघांच्या विरोधात लढून भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय! मुंबईत,धुळ्यात उमेदवारी मागे घेतली नसती तर असंच नाक कापलं असतं! विनोदवीर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं!! मा.देवेंद्रजी आणि चंद्रकांतदांदाचे अभिनंदन!” असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाबरोबरच अकोल्यातही भाजपाचा विजय झाला आहे. अकोला- वाशिम- बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांना ४४३ मते मिळाली. तर, शिवसेना- महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली. महाविकास आघाडीचे जवळपास ८० मते फुटली असल्याचे समोर आले आहे तर, त्याशिवाय ३१ मते अवैध ठरली. तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल यशस्वी ठरले आहेत. बाजोरिया यांचा पराभव हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हे ही वाचा:

ओमिक्रॉनचा पहिला बळी; ब्रिटनमध्ये झाली नोंद

‘हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक’

अकोल्यात शिवसेनेला धक्का; वसंत खंडेलवाल विजयी

नागपूरच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची बाजी

गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव करत वसंत खंडेलवाल यांनी विधान परिषदेत दिमाखात प्रवेश केला आहे. नागपूरमध्येही भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली असून मोठा विजय प्राप्त केला. यापूर्वी धुळे- नंदुरबारमधून भाजपचे अंबरीश पटेल हे बिनविरोध निवडून आले होते. तर मुंबईच्या स्थानिक प्राधिकरण जागेवरील भाजपचे उमेदवार राजहंस सिंह हेही बिनविरोध विधान परिषदेवर गेले. विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या सहा पैकी चार जागांवर भाजपने बाजी मारली आहे, तर प्रत्येकी एका जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Exit mobile version