शिवसेनेमध्ये गळती सुरूचं असून उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का बसला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यातून माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह या माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान असणार आहे.
ठाण्यातील ६६ माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेल्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह हे आमदार शिंदे यांच्याकडे गेले आहेत. एकनाथ शिंदे आणि काही शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे शिवसेनेला खिंडार पडत आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मत करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आमदारांनंतर खासदारांच्या मनातील नाराजी बाहेर येऊ लागल्याचं चित्र आहे.
हे ही वाचा:
नवलानी प्रकरणी संजय राऊतांना दणका; किरीट सोमय्यांना दिलासा
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा
मुख्यमंत्री भगवंत मान बनणार ‘दुल्हेराजा’
नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक
आमदारांच्या नाराजीनंतर आता शाखाप्रमुखांची नाराजी समोर येऊ लागली आहे. शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शाखा क्रमांक ३ चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि शाखा क्रमांक १२ चे शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामणकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला.