युवक काँग्रेसच्या आंदोलनाला गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाने तडकाफडकी पदमुक्त केले आहे. पदावरून दूर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही मोठ्या नेत्यांच्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. नागपूरमध्ये संघ मुख्यालयाला घेराव घालण्याचा आंदोलनाचा अजेंडा होता. मात्र, या महत्त्वाच्या आंदोलनाला दांडी मारल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या ६० पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी पदमुक्त करण्यात आले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीचं राम मंदिर स्थापनेनंतर देशात स्वातंत्र्य अनुभवास आले, असे वक्तव्य केले होते. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आदेशावरून नागपुरात संघ मुख्यालय परिसरात निदर्शने करण्याच्या युवक काँग्रेसच्या महत्वाच्या आंदोलनामध्ये दांडी मारल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
पदावरून दूर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विजय वडेट्टीवार यांची मुलगी आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अनुराग भोयर, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मिथिलेश कन्हेरे यांच्यासह अनेक युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा :
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मार्ग मोकळा
‘व्होट जिहाद पार्ट २’: छ.संभाजी नगरात बांगलादेशी-रोहिंग्यांकडून १० हजारहून अधिक अर्ज!
हिंडेनबर्ग संस्थापक अँडरसन यांच्यावर सिक्युरिटीज फसवणुकीचा आरोप?
महाकुंभ : ८ व्या दिवशी २२ लाखांहून अधिक भाविकांची मेळ्याला भेट!
युवक काँग्रेसने नागपुरात संघ मुख्यालयावर जाऊन मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचे आंदोलन पुकारले होते. मात्र, या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झाले. तर, अनेकांनी या आंदोलनाला दांडी मारली होती. त्यामुळे अवघ्या ५० ते ६० कार्यकर्त्यांसोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना काँग्रेसच्या कार्यालयावरून संघ मुख्यालयाकडे निघण्याची वेळ आली होती. अखेर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोरच अडवले आणि संघ मुख्यालय परिसराला घेराव घालण्यासाठी निघालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुढे काहीही करता आले नाही. त्यामुळेच तडकाफडकी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील ६० पदाधिकाऱ्यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले.