राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार शरद पवार यांचा हात सोडून अजित पवार यांच्या गोटात सहभागी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खळबळजनक दावा केला आहे. ‘गेल्या वर्षी मविआचे सरकार कोसळत असताना ५४पैकी ५१ आमदारांनी शरद पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी विनंती केली होती. मात्र त्यांनी वेळेत निर्णय घेतला नाही आणि एकनाथ शिंदे यांनी ही संधी साधली,’ असे प्रफुल्ल पाटील यांनी म्हटले आहे.
‘अनेक आमदारांना त्यांच्या मतदारसंघासाठी विकासनिधी मिळत नव्हता, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नव्हती तसेच, अनेक छोट्या मोठ्या अडचणीही होत्या. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यामुळे या अडचणी दूर होतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेव्हा धोरणात्मक निर्णय घेतला गेला तेव्हा अजित आणि फडणवीस हे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते, असेही पटेल म्हणाले.
‘केवळ आमदारच नव्हे तर राष्ट्रवादीचे नेते आणि तळागाळाचे कार्यकर्तेही सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक होते,’ असा दावाही त्यांनी केला. ‘जर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेशी हातमिळवणी करू शकते, तर भाजपबरोबर युती करण्यात काहीच अडचण नाही,’ असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. ‘दशकभरापासून आमचे शिवसेनेशी वैचारिक मतभेद आहेत. तरीही आम्ही त्यांच्या सोबतीने सरकार स्थापन केले. आता आम्ही देशहितासाठी भाजपशी हात मिळवले आहेत. ही विचारप्रक्रिया नवी नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी सरकारमध्ये सहभागी झालो आहोत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
उद्योगपती अनिल अंबानींच्या पत्नी टीना यांची ईडी चौकशी
२०२४ नव्हे २०४७ हे आपले उद्दीष्ट
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अमेरिकेत १० हजार जणांचं सामूहिक भगवद्गीता पठण
७ जुलैपासून ९९९ रुपयांत जीओ भारत फोन
आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. मंत्रिमंडळविस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या आणखी आमदारांना स्थान दिले जाईल. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे खातेवाटपाबाबत चर्चा करत आहेत,’ असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी कमकुवत झाली असल्याने भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आगामी निवडणुकीत सहजच विजय होईल, असा दावाही त्यांनी केला. ‘आम्ही हा निर्णय राजीखुशीने घेतलाय, असेही नाही. मात्र राजकारणात काही कठोर निर्णय घ्यावे लागतात,’ अशी कबुलीही त्यांनी दिली.