इस्रायल आणि हमास यांच्यातील अभूतपूर्व लष्करी कारवाईत जवळपास ५०० लोक मारले गेले आहेत. इस्रायलमधील हमासच्या हल्ल्यात ३००हून अधिक जणांचा जीव गेला असून गाझामध्ये इस्रायल संरक्षण दलाने केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत सुमारे २३०हून अधिक जणांचा मृत्यू झाला.
दक्षिण इस्रायलमध्ये इस्रायली लष्कर आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये अजूनही जोरदार संघर्ष सुरू आहे. इस्त्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही. गाझावर इस्रायली बॉम्बफेक रविवारी सकाळपर्यंत सुरूच होती. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या मते, गाझा पट्टीमध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात सुमारे २३० लोक मारले गेले आहेत. वेस्ट बँक प्रदेशातही मृत्यूची नोंद झाली आहे. इस्रायलने केलेल्या ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्समध्ये किमान १७०० लोक जखमी झाले.
रविवारी सकाळी इस्रायल डिफेन्स फोर्स आणि हमास यांच्यातील लढाई सुरूच होती. दक्षिण इस्रायलच्या अनेक भागांमध्ये रॉकेट सायरन वाजत आहेत. गाझा पट्टीजवळील सिडरोट, किबुट्झ नीर आम, याड मॉर्डेचाई आणि नेटिव्ह हासारा सारख्या भागात इशारे ऐकले. गाझा शहराच्या दाट लोकवस्तीचे केंद्र आणि इतर अनेक ठिकाणी रात्रभर जोरदार बॉम्बस्फोट झाले.
इस्त्रायली सरकारने गाझा पट्टीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी इस्रायली वीज कंपनीला शनिवारी गाझा पट्टीचा वीजपुरवठा थांबविण्याचे आदेश दिले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी सकाळी नागरिकांना उद्देशून संबोधन केले. ‘देश एक दीर्घकाळ चालणारे आणि कठीण युद्ध सुरू करत आहे आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत ते चालूच राहील,’ असे त्यांनी जाहीर केले.
हे ही वाचा:
‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये चमकलेल्या मल्लखांबप्रेमी मनोज प्रसादच्या टीमला सहा लाख
भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण
‘विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होणार नाहीत’
न्यूजक्लिककडून शेतकरी आंदोलनाला मदत; चिनी कंपन्यांचे समर्थन?
‘हमासने केलेल्या खुनी हल्ल्याने आम्हाला युद्ध करण्यास भाग पाडले गेले. आमच्या हद्दीत घुसलेल्या बहुतेक शत्रू सैन्याचा नाश करून आम्ही पहिल्या टप्प्यात यश मिळवले आहे. त्याच वेळी, आम्ही आता अविरत, विश्रांती न घेता – जोपर्यंत उद्दिष्टे साध्य होत नाहीत, तोपर्यंत कारवाई करू. इस्रायलच्या नागरिकांना सुरक्षा बहाल करू आणि आम्ही जिंकू,’ असा विश्वास नेतन्याहू यांनी एक्सवर व्यक्त केला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला आठ अब्ज डॉलरचे आपत्कालीन लष्करी मदत पॅकेज मंजूर केले आहे. बायडेन यांनी शनिवारी नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली आणि इस्रायलच्या ‘स्व-संरक्षणाच्या अधिकाराला’ला पूर्ण पाठिंबा दिला. नेतन्याहू यांनीही या समर्थनासाठी बायडेनचे आभार मानले आहेत. त्यांनी हमासच्या विरोधात “दीर्घकाळ मोहीम” चालवण्याच्या गरजेवर भर दिला.
तर, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने हमास गटाचे समर्थन केले आहे. ‘इस्रायलवरील हल्ला हा पॅलेस्टिनी नागरिकांची ‘स्वसंरक्षणाची कृती’ आहे आणि मुस्लिम देशांना त्यांच्या हक्कांचे समर्थन करण्याचे आवाहन केले. या हल्ल्यानंतर इराणमध्ये उत्सव साजरा करण्यात आल्याचे समजते. तसेच, हमासच्या या मोहिमेला अभिमानास्पद कामगिरी संबोधले आहे.
तर, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे तुर्कस्तानने जाहीर केले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील युद्धावर चर्चा करण्यासाठी तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या देशातील राजनैतिक अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे.
तर, हमासने इस्रायलवर केलेले हे आक्रमण पॅलेस्टिनींवरील इस्रायलकडून होणारे अत्याचार आणि अल अक्सा मशिद अपवित्र करण्याच्या कृतीला प्रत्युत्तर आहे, असा दावा हमासने केला आहे. हमासने महिला आणि मुलांसह अनेक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. हमासच्या प्रमुख नेत्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या ताब्यात असलेल्या इस्रायली कैंद्यांची संख्या अनेक पटीने अधिक आहे. इस्रायलला आपल्या तुरुंगातील सर्व पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करण्यासाठी अतिरेकी गटाकडे पुरेसे बंदिवान आहेत, असा दावा केला आहे.