तेलंगणा राज्याचा सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भारत राष्ट्र समितीने देशभरात आपले हातपाय पसरवण्याचा मनोदय जाहीर केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव त्या अनुषंगाने दौरेही करत आहेत. महाराष्ट्रातही ते वारंवार दौरे करून येथे स्वत:चे बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना तेलंगणात धक्का बसला आहे. बीआरएसच्या तब्बल ३५ नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
तेलंगणा सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि पाचवेळा आमदार झालेले जुपल्ली कृष्णा राव, माजी खासदार पोंगुलेटी आणि सहावेळा आमदार राहिलेले गुरुनाथ रेड्डी यांच्यासह ३५ जणांनी काँग्रेसचा हात धरला आहे. या प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत प्रदेश काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
कर्नाटकमध्ये विजय मिळवल्यानंतर काँग्रेसच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. पक्षाला तेलंगणामध्ये चांगल्या यशाची अपेक्षा आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव याच्याविरुद्ध त्यांच्या स्वत:च्या पक्षात नाराजी आहे, असे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. आणखी काही आमदार आणि नेते पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत. परंतु काँग्रेस संघटनेचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. लवकरच आणखी काही नेते पक्षामध्ये येतील, असाही दावा त्यांनी केला.
हे ही वाचा:
दिल से बुरा लगता है… फेम देवराज पटेलचे अपघाती निधन; कोण आहे देवराज?
मणिपूरमध्ये सैनिकांच्या कामात महिलांचा अडथळा
कंपासमधील ब्लेडने दर्शनावर वार नंतर दगडाने मारहाण
अनधिकृत शाखा तोडल्यामुळे ठाकरे गटाचा थयथयाट
कृष्णा राव सन २०११मध्ये काँग्रेस पक्ष सोडून बीआरएसमध्ये सहभागी झाले होते. सन २०१४मध्ये त्यांनी बीआरएस (तेव्हा टीआरएस)च्या तिकिटावर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी त्यांचे संबंध बिघडले. पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल कृष्णा राव आणि त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना याच वर्षी एप्रिलध्ये पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे ते एकप्रकारे घरी परतले आहेत. तेलंगणाच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तर भाजपचे काही नेतेही काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यांना योग्य वेळी पक्षात दाखल करून घेतले जाईल, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.