टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून शुक्रवारी २४ डिसेंबर रोजी ३३ लाख रुपये सापडले आहेत. आतापर्यंत निलंबित अधिकारी तुकाराम सुपे यांच्याकडून पुणे पोलिसांनी ३ कोटी ८८ लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. पोलिसांची कारवाई सुरु झाल्यावर सुपे यांनी त्यांच्याकडील हे पैसे त्याच्या वेगवेगळ्या नातेवाईकांच्या घरी दडवून ठेवले होते. मात्र, आता कारवाई दरम्यान सुपे यांनी लपवून ठेवलेले पैसै बाहेर येत आहेत.
तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर १७ डिसेंबरला सुपे यांच्या घरात पहिली धाड टाकली होती. तेव्हा पहिल्या धाडी दरम्यान ८८ लाख ४९ हजार ९८० रोख, पाच ग्राम सोन्याचे नाणे, ५ लाख ५० हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर २० डिसेंबरला दुसऱ्या धाडीत सुपेंच्या घरातून २ कोटीहून अधिक रक्कम आणि सोने हस्तगत करण्यात आले होते.
हे ही वाचा:
‘समाजवादी अत्तर’ बनवणाऱ्या उद्योजकांवर आयकर विभागाची धाड! सापडले १५० कोटी रुपये
अतुल राणे यांची ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती
आनंद महिंद्रा म्हणतात, ती जीप मला द्या; मी बोलेरो देतो
आसाम, पंजाब आणि आता उत्तराखंड; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या तत्कालीन संचालक अश्विन कुमार यालाही अटक केली. या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत २०२०च्या टीईटी परीक्षेच्या सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. या आधारे टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी करून तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती.