पेंग्विनसाठी चार वर्षात तब्बल १९ कोटींचा खर्च

पेंग्विनसाठी चार वर्षात तब्बल १९ कोटींचा खर्च

एकीकडे सर्वसामान्य जनतेला मुंबईत जगण्यासाठी झगडावे लागत आहे. तर दुसरीकडे याच मुंबईत पेंग्विनच्या आलिशान लाईफस्टाईलवर करोडो रुपये खर्च केले जात आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी उद्यान विभागाने गेल्या चार वर्षांत केलेल्या खर्चाची माहिती मागितली होती. त्याबाबत महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने २०१८ ते २०२१ पर्यंत म्हणजे गेल्या चार वर्षांत तब्बल २४३.६५ कोटी रुपये खर्च केलेत. यामध्ये भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी गत चार वर्षांमध्ये तब्बल १९.११ कोटी खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. तर प्राणिसंग्रहालयातील उद्यानासाठी ९.५२ कोटींचा खर्च केल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे ही पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप केला जातं आहे.

पेंग्विन हा पक्षी अंटार्टिका खंडातील बर्फाच्छादित प्रदेशात राहणारा पक्षी आहे. त्यामुळे पेंग्विन पक्षाला मुंबईत आणण्यास अनेक वन्यजीव तज्ज्ञांनी विरोध केला होता. पेंग्विन इतर कोणत्याही प्रकारच्या वातावरणात जगू शकत नाही. तसेच मुंबईतील दमट वातावरणात पेंग्विन फार काळ जगणार नाहीत, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला होता. पेंग्विन हा नैसर्गिक उणे वातावरणात कळपाने राहणारा पक्षी असल्याने तो कृत्रिम वातावरणात जगणार नाही, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे होते. मुंबईत वातावरण दमट तसेच प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा परिणाम पेंग्विनवर होईल, अशी भीती व्यक्त होत होती. प्रसिद्ध वन्यजीव तज्ज्ञ देबी गोएंका यांनीदेखील त्या वेळी नाराजी व्यक्त केली होती. इतर देशांतून पेंग्विन इथे आणणे हा एक अनावश्यक प्रयत्न आहे.’ असे त्यांनी म्हटले होते. मात्र तरीही मुंबईत पेंग्विन आणण्यात आले होते. पेंग्विनला मुंबईत आणायचे निश्चित झाल्यानंतर पालिकेने राणीबागेत अंटार्टिका खंडाच्या वातावरणाच्या धर्तीवर उत्तम दर्जाची सुविधा निर्माण केली होती.

महापालिकेने उद्यान विभागासाठी चार वर्षात जवळपास २४३ कोटी रुपये खर्च केले. त्यात भायखळा प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एन्ट्री प्लाझा, अंतर्गत पॉकेट गार्डन, सार्वजनिक सुविधा, सीसी टीव्ही, इंटरप्रिटेशन सेंटर, पेंग्विन प्रदर्शन, तृणभक्षकांसाठी क्वारंटाईन, प्राणिसंग्रहालय, किचन कॉम्प्लेक्स, हेरिटेज स्ट्रक्चरचे जीर्णोद्धारासाठी तब्बल ९५ कोटी; तर दुसऱ्या टप्प्यांत इतर कामांसाठी ६२.९१ कोटी रुपये खर्च केले. त्यात लांडगा, अस्वल, मांजरांचे कॉम्प्लेक्स; कोल्हा, तरस, बिबट्या, पक्ष्यांचे जाळे, मगर, कासवांचे तलाव यांचा समावेश आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यातील निविदेत वाघ, सिंह, सांबर, हरण, नीलगाय, चार शिंगी मृग, हरण, काळवीट आणि पक्ष्यांचे आणखी एक जाळे आदींसाठी ५७.११ कोटी खर्च करण्यात आल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

उद्यान विभागाचा खर्च पाहून पेंग्विन, वाघ तसेच अन्य प्राणी मुंबईकरांपेक्षा चांगले जीवन जगत असल्याचे दिसत आहे. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या या घरांची किंमत प्रत्येकी पाच ते नऊ कोटी इतकी आहे. सर्वसामान्य मुंबईकरांनी भरलेल्या करातून हा खर्च केला आहे.

Exit mobile version