उत्तर प्रदेशमधील गुंडाराज हा कायमच राष्ट्रीय चर्चेचा विषय राहिला आहे. पण योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून उत्तर प्रदेशात १५१ गुन्हेगारांना एनकाउंटरमध्ये मारण्यात आले आहे. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भात खुलासा केला असून गुन्हा आणि गुन्हेगारी यांच्याप्रती शुन्य सहनशीलता असणारे आमचे धोरण आहे असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
गुरुवार, २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिनाच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की मार्च २०१७ पासून राज्यातील पोलिसांनी १५१ गुन्हेगारांना यमसदनी धाडले आहे. गुंडांसोबत झालेल्या चकमकीमध्ये स्वतःच्या बचावासाठी हा गोळीबार पोलिसांकडून करण्यात आला. ज्याला अधिकृतपणे एनकाउंटर असे म्हटले जाते. तर या चकमकीमध्ये ३४७३ गुन्हेगार हे जखमी झाले आहेत.
हे ही वाचा:
पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले
१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र
करी रोडमधील अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट
३१ मार्च २०१७ ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत उत्तर प्रदेशमधील १३ शूरवीर पोलीस हुतात्मा झाले आहेत तर ११९८ पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. या कालावधीत पोलिसांनी ४५ हजार ६०३ अट्टल गुन्हेगारांवर गॅंगस्टर कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली आहे. तर ६५७ जणांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर २५ माफियांची संबंधित तब्बल १५०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, सोडवण्यात आली आहे किंवा जमीनदोस्त करण्यात आली आहे.
या सर्व कामगिरीसाठी योगी आदित्यनाथ यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे भरभरून कौतुक केले असून पोलिसांनी केलेल्या अपार मेहनतीमुळे आणि योजनाबद्ध कामगिरीमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचे भय निर्माण झाले आहे असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.