‘या’ महापुरुषाची जयंती ठरली जनजातीय गौरव दिवस

‘या’ महापुरुषाची जयंती ठरली जनजातीय गौरव दिवस

१५ नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिवस किंवा आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, १० नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारची महत्वपूर्ण अशी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

थोर स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांची १५ नोव्हेंबर रोजी जयंती असते. त्यांच्या जयंती दिनी हा जनजाती गौरव दिवस साजरा करण्यात यावा असा केंद्र सरकारचा मानस आहे. हा दिवस शूर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीला समर्पित करण्यात येणार आहे. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती भावी पिढ्यांना व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

संथाल, तामर, कोल, भिल्ल, खासी आणि मिझो यांसारख्या विविध जनजाती समुदायांच्या अनेक चळवळींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला बळकटी दिली. आदिवासी जनतेच्या क्रांतिकारी चळवळी आणि संघर्ष त्यांच्या अतुलनीय धैर्याचे आणि सर्वोच्च बलिदानानचे दर्शन घडवतात. ब्रिटीश वसाहतवादी राजवटीविरुद्ध देशातील विविध प्रदेशातील आदिवासी चळवळी राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याशी जोडल्या गेल्या आणि देशभरातील जनतेला त्यातून प्रेरणा मिळाली. मात्र, या आदिवासी वीरांबद्दल बऱ्याच लोकांना फारशी माहिती नाही.

हे ही वाचा:

परमबीर सिंग यांच्याविरोधात तिसरे अजामीनपात्र वॉरंट जारी

पराभवाच्या भीतीने शिवसेनेला हुडहुडी भरली

महानगरपालिकेत आता २२७ ऐवजी २३६ वॉर्ड

भारताने आयोजित केलेल्या एनएसए बैठकीत काय झाले?

भगवान बिरसा मुंडा हे या क्रांतीचे जनक मानले जातात. १५ नोव्हेंबर हा त्यांच्या जन्मदिवस असून देशभरातील आदिवासी समुदाय त्यांना भगवान म्हणून पूज्य मानतात. बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश राजवटीच्या शोषक व्यवस्थेविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि ‘उलगुलान’ (क्रांती) ची हाक देत ब्रिटीश दडपशाहीविरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले.

Exit mobile version