ठाण्यातील विवियाना मॉल प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना चित्रपटगृहात घुसून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढत मारहाण केली होती. याप्रकरणी शुक्रवारी जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती.
जितेंद्र आव्हाड यांना आज, १२ शनिवार ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी आव्हाडांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, आव्हाडांच्या वकिलांनी त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. जामिनावर सुनावणी आजचं होणार असून, दोन्ही बाजू ऐकून न्यायालय निकाल देणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, १२ हजार रोजगार होणार निर्माण
‘या’ कारणामुळे ट्विटरच्या ‘ब्लू टिक’ पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे
आरेमध्ये बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला
गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम ; शिंदे गटात सामील
सोमवारी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपट सुरु होता. याची माहिती जितेंद्र आव्हाड यांना लागली आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत विवियाना मॉलच्या चित्रपटगृहात गेले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना जबरदस्तीने बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी प्रेक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी आव्हाडांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. अटकेपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी तीन ट्विट करून अटकेची माहिती दिली होती.