२५ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. एकूण १२८ नावे निवडण्यात आली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २१ मार्च रोजी पद्म पुरस्कार विजेत्यांना पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान केली. या १२८ नावांपैकी एक नाव स्वामी शिवानंद यांचेही आहे, ज्यांना योग क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
स्वामी शिवानंद पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर बसत वंदन केले तेव्हा मोदीही उठून उभे राहिले आणि त्यांनीही नतमस्तक होत शिवानंद यांना वंदन केले.
१२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांना योग क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच स्वामींनी मानव कल्याणासाठी त्यांचे जीवन समर्पित केले आहे. स्वामी शिवानंद हे गेल्या ५० वर्षांपासून पुरीमधील कुष्ठरोगग्रस्तांची सेवा करत आहेत. योग आणि प्राणायामचा अवलंब केल्यास दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळू शकते. प्राणायाम आणि घरगुती उपचार हे निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. त्याचा दैनंदिन जीवनात समावेश केला पाहिजे. पूर्वीचे लोक या जीवनशैलीचा अवलंब करून शंभर वर्षांहून अधिक जगले, असे स्वामी शिवानंद यांचे मत आहे.
स्वामी शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी बांगलादेशातील सिलेट जिल्ह्यातील हरिपूर गावात झाला. ते रोज पहाटे तीन वाजता उठतात. स्नान करून दैनंदिन कामे केल्यावर ते भगवंताच्या भक्तीत लीन होतात. अन्नामध्ये ते फक्त उकडलेले अन्न आणि खडे मीठ खातात.
योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित झालेल्या स्वामी शिवानंद यांची नम्रता आणि साधेपणा पाहून राष्ट्रपती भवनात उपस्थित पाहुणेही थक्क झाले. योगगुरूंनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींना साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर पंतप्रधानही त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. यानंतर स्वामी शिवानंद यांनी राष्ट्रपतींसमोर नतमस्तक होऊन नमस्कार केला. त्यांनतर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांचा सन्मान केला.
हे ही वाचा:
बुलडोझरच्या भीतीने आरोपीने केलं आत्मसमर्पण
कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी
‘त्या’ धावणाऱ्या मुलावर झाले आनंद महिंद्र फिदा
भाजपाला मतदान केल्यामुळे महिलेला तिहेरी तलाकची धमकी
दरम्यान, यासोबतच देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या दोन्ही मुलींना राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा मुलगा कृष्णकुमार खेमका यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला.तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.