भाजपाचे १२ निलंबित आमदार ५:४५ वाजता राज्यपालांना भेटणार

भाजपाचे १२ निलंबित आमदार ५:४५ वाजता राज्यपालांना भेटणार

गैरवर्तनाच्या कारणावरून भाजपाचे १२ आमदार निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता हे सर्वच्या सर्व निलंबित आमदार राज्यपालांना भेटणार आहेत. हे आमदार राज्यपालांना भेटून वस्तुस्थिती मांडतानाच ठाकरे सरकारची तक्रारही करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना भाजपाच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. काही आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली असा आरोप ठाकरे सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे अध्यक्ष प्रचंड संतप्त झाले होते. परिणामी या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं. आता हे आमदार आज संध्याकाळी ५:४५ वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागणार आहेत. त्याबाबत भाजपची बैठक सुरू झाली असून त्यात पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले.

हे ही वाचा:

ट्विटर अखेर तक्रार अधिकारी नेमणार

वारीला बंदी म्हणजे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप

या ठरावाने ओबीसींना आरक्षण मिळणार नाही

ठाकरे सरकार अजून किती स्वप्निलच्या आत्महत्येची वाट पाहणार?

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहाचं वातावरण अधिकच तापलं होतं.

Exit mobile version