आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांचे प्रभाग बदलले

आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांचे प्रभाग बदलले

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी मंगळवार, ३१ मे रोजी आरक्षण सोडत जाहीर केली. मुंबईतील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुंबई पालिकेकडून आरक्षित आणि अनारक्षित वॉर्डांची यादी जाहीर करण्यात आली. ओबीसी आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाशिवाय महिलांसाठी ११८ प्रभाग निश्चित करण्यात आले.

सर्वसाधारण महिला गटासाठी १०९, अनुसूचित जातीपैकी आठ आणि अनुसूचित जमातीसाठी एक प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत आक्षेप असणाऱ्यांनी १ ते ६ जूनपर्यंत हरकती व सूचना पाठवायच्या आहेत. त्यानंतर १३ जूनला त्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यानंतर काही नगरसेवकांना धक्का बसला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि राष्ट्रवादी गटनेत्या राखी जाधव यांचा प्रभाग महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या पत्नी ज्योती अळवाणी यांचा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. महिलांचे आरक्षण लागू झाले तिथे नगरसेवक आपल्या घरातील महिलेला संधी देण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे यशवंत जाधव, आशीष चेंबूरकर, संजय घाडी याचेही प्रभाग बदलले आहेत. तर भाजपाच्या आकाश पुरोहित, प्रभाकर शिंदे, नील सोमय्या यांचे प्रभागही बदलले आहेत.

हे ही वाचा:

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’

राजस्थानमध्ये RSS च्या संयोजकांची हत्या; शहरात १४४ लागू

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी एकाला अटक

सर्वोच्च न्यायालयाने चार मे रोजी दिलेल्या आदेशात चार आठवड्यांत पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले होते. मुंबईत यंदा नऊ प्रभागांची वाढ होऊन २२७ वरून २३६ प्रभाग झाले आहेत. आरक्षणावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी मुंबईतील २४ प्रभागांमध्ये यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

Exit mobile version