‘राणीच्या बागेत दुर्मिळ प्राण्यांच्या नावाने १०६ कोटींचा घोटाळा’

‘राणीच्या बागेत दुर्मिळ प्राण्यांच्या नावाने १०६ कोटींचा घोटाळा’

मुंबईच्या राणी बागेतील कंत्राटावरून राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच असतात. राणी बागेतील प्राण्यांवरून महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. राणी बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत तब्बल १०६ कोटींचा गैरप्रकार झाला असून ही निविदा प्रक्रिया त्वरीत थांबवावी अशी मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे. ही निविदा प्रक्रिया न थांबविल्यास भाजपा आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मिहीर कोटेचा यांनी गुरुवार २० जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आहेत. भाजपाने मुंबई महापालिकेतील रस्ते कामातील घोटाळे उघडकीस आणले होते. परिवहन महामंडळाच्या ई- तिकीट यंत्र खरेदीतील घोटाळाही भाजपाने उघडकीस आणल्याचे मिहीर कोटेचा म्हणाले.

महापालिकेच्या रस्ते निविदांमध्ये गैरप्रकार करणारी मुंबई महापालिकेतील कंत्राटदार टोळी आता दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेतही उतरली आहे, असा आरोप कोटेचा यांनी केला आहे. राणीच्या बागेत ब्लॅक जॅग्वार, व्हाईट लायन, चिंपांझी, चित्ता या सारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. १०० कोटींच्या वरच्या निविदेत विदेशी कंपन्याही सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे १८५ कोटींच्या निविदेचे दोन भाग करण्यात आल्याचे कोटेचा यांनी सांगितले.

निविदा रकमेपेक्षा अधिक रकमेच्या निविदा भरल्या जातील, असे पत्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना २० ऑक्टोबर रोजी पाठवल्याचे कोटेचा म्हणाले. भाजप नेता विनोद मिश्रा यांनीही असेच पत्र महापालिका आयुक्तांना २१ ऑक्टोबर रोजी पाठविले होते. त्यानंतर २९ नोव्हेंबरला निविदा उघडण्यात आल्या आणि शक्यता वर्तवण्यात आली होती ती खरी ठरल्याचे कोटेचा म्हणाले.

हे ही वाचा:

धक्कादायक! माजी सरपंचाने गर्भवती वनरक्षकाला केली मारहाण

वैद्यकीय अभ्यासक्रमात २७ टक्के ओबीसी आरक्षणाला ‘सर्वोच्च’ पाठिंबा

‘१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी पाकिस्तानचे होते पाहुणे’

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुन्हा शाळा सुरू

हाय वे आणि स्काय वे या कंपन्यांनी १०६ कोटी अधिक रकमेची निविदा सादर केली आहे. १८८ कोटींच्या बोलीसाठी २९४ कोटींच्या निविदा सादर केल्या गेल्या आहेत, असे कोटेचा यांनी सांगितले. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली असून या प्रक्रियेच्या चौकशीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

Exit mobile version