राज्य सरकारची वसुली आधी १०० कोटीची होती. आता ही वसुली ३०० कोटींवर गेली आहे. परिवहन विभागातही महावसुली सुरू असल्याची तक्रार नाशिकमध्ये दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
गजेंद्र पाटील यांनी या महावसुली विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत.
१०० कोटी महावसूली आता ३०० कोटीवर ? परिवहन मंत्री परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार, गृहमंत्री वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 29, 2021
पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचं रॅकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केला आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. परिवहन विभागात देखील पैसे वसुली सुरू आहे. परिवहन विभागाच्या वाहन निरीक्षकानेच त्याचं बिंग फोडलं आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यात थेट अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा नाशिकच्या क्राईम ब्रँचने तपास सुरू केला आहे. मात्र, याबाबत अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. परंतु, या घोटाळ्याची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.
हे ही वाचा:
कोविड-१९ रुग्णसंख्येत पुन्हा घट, १.७३ लाख नवे रुग्ण
ओबीसी आरक्षणाला दणका, ठाकरे सरकारची याचिका फेटाळली
उल्हासनगरात स्लॅब कोसळून सात जणांचा मृत्यू
संदीप देशपांडे यांनी ट्विट करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. १०० कोटीची महावसूली आता ३०० कोटीवर? परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का?, असा सवाल देशपांडे यांनी ट्विटमधून केला आहे.