१०० कोटींची लाच; १० पेक्षा अधिक मोबाइल बदलले

माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीवर आरोप

१०० कोटींची लाच; १० पेक्षा अधिक मोबाइल बदलले

ईडीने शुक्रवारी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता यांना हैदराबादमधून अटक केली. त्यांना चौकशीसाठी दिल्लीत नेले जाणार आहे. याच प्रकरणी ईडीने गुरुग्राममधील व्यावसायिक अमित अरोरा याला ३० नोव्हेंबर, २०२२ रोजी अटक केली होती. अमितने त्याच्या चौकशीत कविता यांचे नाव घेतले होते. ईडीने केलेल्या दाव्यानुसार, कविता या ‘साऊथ ग्रुप’ नामक एका मद्याच्या लॉबीची प्रमुख होत्या. त्यांनी अन्य व्यावसायिकाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये ‘आप’च्या नेत्यांना १०० कोटी रुपये दिले होते. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये ईडीने या प्रकरणात कविता यांच्या नावाचाही समावेश केला होता.

कविता त्या साऊथ ग्रुपमध्ये सहभागी होत्या, ज्यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सारथ रेड्डी, एम. श्रीनिवासुलू रेड्डी, राघव मगुंटा यांचाही सहभाग होता, असा दावा ईडीने केला होता. या गटाचे प्रतिनिधीत्व अरुण पिल्ले, अभिषेक बोइनपल्ली आणि बुची बाबू यांनी केले होते. दिल्लीमध्ये सन २०२१-२२ मध्ये मद्यधोरणात विक्रेत्यांना १२ टक्के नफा आणि किरकोळ विक्रेत्यांना सुमारे १८५ टक्के नफा दिला गेला होता.

ईडीने केलेल्या दाव्यानुसार, १२ टक्के नफ्यातली सहा टक्के रक्कम किरकोळ विक्रेत्यांना आम आदमी पक्षाच्या नेत्यांना लाचेच्या स्वरूपात दिली जाणार होती. साऊथ ग्रुपचा नेता विजय नायर याला सुमारे १०० कोटी रुपयांची लाच आगाऊ दिली गेली होती. या लाचेच्या बदल्यात नायरने साऊथ ग्रुपला घाऊक व्यापारात भागीदारी सुनिश्चित केली होती. कारण दिल्लीच्या मद्य व्यापाऱ्यात त्याचा तितकासा जम नव्हता, असा ईडीचा दावा आहे.

साऊथ ग्रुपशी भागीदारी करणाऱ्या संस्थांमध्ये समीर महेंद्रू याच्या इंडो स्पिरिट्सचाही समावेश होता. समीरने साऊथ ग्रुपच्या अरुण पिल्लई आणि प्रेम राहुल मंदुरी यांना दिलेल्या ६५ टक्के भागीदारीसह या फर्मची स्थापना केली होती. या फर्ममध्ये कविता, श्रीनिवासुलू रेड्डी आणि राघव मगुंटा भागीदार होते.

ईडीने ७ मार्च रोजी हैदराबादचा व्यापारी अरुण पिल्लई याला अटक केली. पिल्लईने ईडीला चौकशीत सांगितल्यानुसार, आप आणि कविता यांच्यात करार झाला होता. त्याअंतर्गत १०० कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली होती. त्यातूनच कविता यांची कंपनी इंडोस्पिरिट्सला दिल्लीच्या मद्यव्यापारात प्रवेश मिळाला होता.

हे ही वाचा..

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेल्या अरविंद केजरीवालांना अटकपूर्व जामीन

आता शिक्षकांनी कपडे कोणते घालावेत हे शाळा ठरवणार!

लष्कराचे गणवेश विकून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताला अटक

“बाल स्वरूपातील मूर्ती साकारताना प्रभू रामचंद्रांनी खूप परीक्षा घेतली”

ईडीच्या दाव्यानुसार, कविता यांनी सन २०२१ आणि २०२२ मध्ये सुमारे १० फोनचा वापर केला. डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी आणि तपास दुसऱ्या दिशेला वळवण्यासाठी असे केले गेल्याचे मानले जाते. त्या घोटाळ्यात सक्रिय भागीदार होत्या आणि त्यांनी त्यांचे सहकारी अरुण पिल्लई, बाबू आणि अन्य लोकांना लाच देऊन व्यापार करण्याच्या पद्धतीबाबत सांगितले होते.

Exit mobile version