पेगासस प्रकरणावरून संसदेत आज प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे प्रकरण लावून धरले आहे. काही गोंधळी सदस्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवर आणि मीडिया गॅलरीच्या दिशेने कागद फेकले. संसदेत जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. वारंवार संसदेचं कामकाज तहकूब करावं लागत असल्याने १० गोंधळी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडून आणण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेचे सत्र सुरु होण्यापूर्वीच विरोधकांना आवाहन केले होते की, विरोधकांनी हव्या त्या विषयावर चर्चा करावी, परंतु सरकारने दिलेली उत्तरं ऐकावीत सुद्धा. सरकारने दोन्ही सभागृहांमध्ये असे सांगितले आहे की, सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधक अजूनही गदारोळ थांबवत नाहीयेत. त्यामुळे संसदेत अजूनही काहीही काम होऊ शकलेले नाही.
आज सकाळीच विरोधकांच्या या हालचालीची चाहूल सुरु झाली. संसद परिसरात विरोधकांनी एकत्रित बैठक आयोजित केली. या बैठकीला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही उपस्थिती होती. १४ पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती या बैठकीला होती. ज्यात शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत ठरेलल्या रणनीतीचे पडसाद सभागृह सुरु झाल्यावर लगेच दिसले आणि विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. सदनाच्या बाहेर येऊन एकत्रित पत्रकार परिषद घेत सरकारवर तोफ डागली. पेगासिसची पाळत हा प्रायव्हसीचा विषय नाही तर देशाशी धोका असल्याची टीका राहुल गांधींनी केली. काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावत शिवसेनाही या विरोधात सहभागी झाली आणि विरोधकांची एकजूट कायम राहणार असल्याचा इशारा दिला.
हे ही वाचा:
रिझर्व्ह बँकेची आता ‘या’ बँकवर मोठी कारवाई
लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला आणि ठाकरे सरकारला
येडियुरप्पांचे कार्य शब्दात व्यक्त करण्यापेक्षाही मोठे
भारताची खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा कोरोनाचे संकट
दरम्यान, सभागृहात खासदारांकडून रोज गोंधळ घातला जात आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजात व्यत्यय येत आहे. आज सकाळी तर काही सदस्यांनी थेट अध्यक्षांवरच कागदांची उधळण केली. त्यामुळे या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. सुमारे १० खासदारांना निलंबित केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.