हरयाणा करणार इस्रायलसाठी १० हजार कुशल कामगारांची भरती

इस्रायलच्या बांधकाम क्षेत्रात तुटवडा

हरयाणा करणार इस्रायलसाठी १० हजार कुशल कामगारांची भरती

वाढत्या बेरोजगारीमुळे हरयाणा सरकारला तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागत असतानाच सरकारच्या ‘हरयाणा कुशल रोजगार निगम’तर्फे (एचकेआरएन) शुक्रवारी इस्रायलसाठी १० हजार कुशल कामगारांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. इस्रायलने हमासविरोधात युद्ध पुकारल्यानंतर इस्रायलमध्ये बांधकाम क्षेत्रात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. हरयाणा सरकारने दुबईमध्ये ५० बाऊन्सर्स आणि ब्रिटनमध्ये १२० परिचारिकांच्या नियुक्तीसाठीही जाहिरात काढली आहे.

दर महिन्याला सव्वा लाख पगार

रोजगार निगमने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रातील नोकरीसाठी इयत्ता दहावी ही किमान शैक्षणिक पात्रता आहे. उमेदवाराचे वाय २५ ते ५४ दरम्यान असणे आवश्यक असून त्यांना किमान तीन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.

जाहिरातीनुसार, या नोकरीसाठी ६१०० एनआयएस (इस्रायली चलन) मिळतील. म्हणजेच भारतीच चलनानुसार, दर महिन्याला एक लाख ३४ हजार रुपये मिळतील. एक एनआयएसची किंमत भारतीय चलनात २२ रुपये आहे. उमेदवारांना औद्योगिक इमारतीचे बांधकाम, लाकडाचे काम, जमीन आणि भिंतीवर सिरॅमिक लाद्या बसवण्याचे काम, प्लास्टरिंगचे काम आणि लोखंड वाकवण्याचे काम येणे आवश्यक आहे. तसेच, बांधकामाचा आराखडा वाचता येईल आणि समजेल इतपत ज्ञानही असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील मानेचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पंड्याच्या हाती!

महिला न्यायाधीशाची मुख्य न्यायाधीश चंद्रचूडांकडे इच्छामरणाची मागणी!

एसआरए सदनिका पाच वर्षांनी विकण्याचा मार्ग मोकळा होणार?

९० हजार पॅलिस्टिनींचा कामाचा परवाना रद्द

इस्रायलने हमासविरोधात युद्ध पुकारल्यानंतर सुमारे ९० हजार पॅलेस्टिनींचा कामाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तेथे कामगारांची अभूतपूर्व टंचाई जाणवत आहे. बांधकाम श्रमिकांचा पुरवठा करण्यासंदर्भात इस्रायल बिल्डर असोसिएशन भारताशी चर्चा करत असल्याचे वृत्तही काही दिवसांपूर्वी आले होते.

संसदेतही बेरोजगारीचा मुद्दा

पॅलिस्टिनी कामगारांचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारतीय कामगार पुरवण्यासंदर्भात केंद्र सरकार आणि इस्रायल दरम्यान कोणतीही चर्चा झाली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी नुकतेच राज्यसभेसमोर स्पष्ट केले होते. त्यानंतर काही दिवसांतच हरयाणा सरकारने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

हरयाणातील रोजगार ३१५ टक्क्यांनी वाढला

कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी २० जुलै रोजी सन २०१४पासून हरियाणातील रोजगार ३१५ टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती संसदेत दिली होती. याबाबत काँग्रेसचे खासदार दीपेंदरसिंग हुडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. जुलैपर्यंत हरियाणातील विविध जिल्ह्यांतील रोजगार केंद्रांत सुमारे पाच लाख ४३ हजार ८७४ जणांनी नावे नोंदवली होती. यामध्ये जिंद जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ हजार ८९ नोंद झाली होती. त्यापाठोपाठ कैथल (४७, ५९३), हिसार (४६, ४५३), कर्नाल (४२, ४४६), यमुनानगर (३४, ६४२) अशी नोंद झाली होती. गुरगावमधून केवळ चार हजार ५४८ जणांनी नोंद केली होती, तर, फरिदाबादमध्ये (४, ५४८), पंचकुलामध्ये (७, ५६५) जणांनी नोकरीसाठी नोंद केली होती.

Exit mobile version